Sat, Jul 20, 2019 03:06होमपेज › Kolhapur › एस. टी. ने गाठली सत्तरी..!

एस. टी. ने गाठली सत्तरी..!

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 11:46PM

बुकमार्क करा

राशिवडे : प्रवीण ढोणे

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन 1948 सालापासून शहरासह ग्रामीण भागामध्ये दळणवळणासाठी धावणार्‍या एस.टी.ने बघता - बघता सत्तरी गाठली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा राज्यापर्यंत एस.टी. पोहोचली असून सत्तरी गाठलेल्या एस. टी.ला मात्र खासगी प्रवाशी वाहतूक आव्हानात्मक ठरत आहे.

राज्यात 1932 च्या सुमारास खासगी वाहतूक सुरू झाली. कालांतराने वाहतुकीच्या नियमनांची गरज भासू लागली. 1947 मध्ये ब्रिटिश राजवट संपल्यानंतर बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्टची स्थापना 1948 ला झाली आणि 1 जून 1948 या दिवशी पुणे-नगर मार्गावर पहिली एस.टी. धावली. ग्रामीण भाग शहरांना जोडण्याच्याद‍ृष्टीने खर्‍या अर्थाने गती येऊ लागली. दळणवळणाची पुरेशी साधणे नसल्याने ग्रामीण भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही; परंतु एस.टी.ने शहरी व ग्रामीण भागामध्ये पाय पसरले.

विद्यार्थी सवलत पास, स्वातंत्र्य सैनिकांना मोफत प्रवास, अपंगाना सवलत पास अशा विविध सवलतीच्या सेवा एस.टी. आतापर्यंत देत आहे. राज्यात दीड हजारहून अधिक बसस्थानके असून लांब पल्ल्याच्या मार्गावरही खासगी प्रवाशी वाहतुकीला साजेशा गाड्या धावत आहेत. सुरक्षित प्रवास म्हणून एस.टी.कडे विश्‍वासानं पाहिलं जातं; परंतु खासगी प्रवाशी वाहतूक वाढल्याने एस.टी.ला घरघर सुरू झाली.

खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाना चांगल्या सुविधा पुरवून विश्‍वास संपादन करून घेतला आहे. खासगी वाहतूक शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातही जोमाने सुरू आहे. त्यामुळे एस.टी.कडे प्रवाशी पाठ फिरवत आहेत. हे ओळखून महामंडळानेही खासगी वाहतूकदारांप्रमाणे एस.टी.मध्ये मोठा आमूलाग्र बदल केला आहे. राज्यातील बारा विभागांमध्ये विभागलेल्या एस.टी.चे वार्षिक उत्पन्‍न साडेचार हजार कोटींच्या जवळपास आहे. प्रामुख्याने धावत्या आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे सरकणार्‍या या युगामध्ये काही तात्विक बाबीमुळे एस.टी.कडील प्रवाशांचा ओढा घटला असला तरी ग्रामीण भागामध्ये एस.टी. गोरगरिबांना आधारवडच ठरत आहे.