Sat, Feb 23, 2019 10:13होमपेज › Kolhapur › शिक्षक अपहरणातील सात जणांना अटक

शिक्षक अपहरणातील सात जणांना अटक

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:29AMइचलकरंजी : वार्ताहर

जमिनीच्या प्रकरणात भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील शिक्षकाचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी उकळणार्‍या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या अवघ्या सहा तासांत आवळण्यात कोल्हापूर, इचलकरंजी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व भुदरगड पोलिसांच्या पथकाला यश आले.

या टोळीत मुरगूड येथील धीरज ऊर्फ गुंड्या दिलीप सावर्डेकर (वय 29, रा. सावर्डेकर कॉलनी), विकास वसंतराव निकम (37, रा. मगदूम गल्ली), सयाजी सुनील राऊत (22), अविनाश शिवाजी आडावकर (26, रा. गणेश गल्ली, धामणी, ता. आजरा), पांडुरंग भिकाजी बोटे (28, रा. पिंपळगाव, ता. भुदरगड), इरफान गौस हावळे (24, रा. म्हाळकवडा, महागाव, ता. गडहिंग्लज), योगेश ऊर्फ सोन्या जयराम भाईंगडे (28, रा. इंदिरानगर उत्तूर, ता. आजरा) 
आदींचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी दोघे संशयित फरारी आहेत. याबाबतची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना दिली.  या सात जणांकडून एसयूव्ही महिंद्रा कार, मारुती कार, तलवार, जांबिया, दोन बेसबॉल बॅट, सुताच्या चार दोर्‍या, नऊ मोबाईल संच व 6410 रुपयांची रोकड असा पाच लाख 75 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील संजय घोडके हे शिक्षक आहेत. 2007 मध्ये त्यांनी याच परिसरात राहणारे एकनाथ पवार यांची सात गुंठे जमीन खरेदी केली होती. त्या ठिकाणी त्यांनी गॅस एजन्सी सुरू केली आहे. या एजन्सीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्यामुळे जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा हव्यास पवार यांना लागला होता. त्यातूनच त्यांचाच भाऊ डॉ.काशिनाथ पवार याने जमिनीच्या अनुषंगाने दिवाणी न्यायालयात दावाही दाखल केला. त्याशिवाय आणखी 33 लाख रुपये पवार यांनी घोडके यांच्याकडे मागणी केली होती. त्यापैकी 22 लाख रुपये त्यांनी घोडके यांच्याकडून वसूल केले होते. जमीन मिळवण्यासह घोडके यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा हव्यास एकनाथ पवार याचा चांगलाच वाढला. त्यातूनच त्याने मुरगूड येथील धीरज ऊर्फ गुंड्या दिलीप सावर्डेकर, विकास निकम या दोघांच्या आंतरराज्य टोळीला घोडके यांना खंडणीसाठी धमकावण्याची सुपारी दिली.

त्याप्रमाणे 21 जून रोजी योगदिनाच्या दिवशी संजय घोडके यांची गाडी पिंपळगाव येथे अडवून धीरज सावर्डेकर याच्या टोळीने त्यांचे अपहरण केले. घोडके यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना कागल येथील माळावर नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. केवळ सहा हजार रुपयांची रक्कम घोडके यांच्याकडे मिळाली. तेथून या टोळीने घोडके यांना कोल्हापुरातील वृषाली हॉटेल परिसरात नेले. त्या ठिकाणी मित्रांच्या मदतीने घोडके यांनी 93 हजारांची रक्कम अपहरणकर्त्यांना देऊन सुटका करून घेतली.

त्यानंतर भीतीमुळे घोडके काही दिवस इचलकरंजीत वास्तव्यास होते. याबाबतची माहिती मिळताच श्रीनिवास घाडगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला. याबाबत भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून भुदरगड पोलिसांसह इचलकरंजी व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींनी गतीने प्रयत्न सुरू करीत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम केले. मोबाईलचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज याआधारे मोटारींचा शोध लागला. त्यातूनच हे सर्व संशयित कागल येथील माळावर फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जयसिंग तलाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी सर्वच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखीन दोघे संशयित असून ते मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या टोळीची मुरगूडसह कर्नाटकातही दहशत आहे.