होमपेज › Kolhapur › अविश्‍वासापूर्वीच तेलींचा राजीनामा

अविश्‍वासापूर्वीच तेलींचा राजीनामा

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:29AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती जयश्री तेली यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीच्या सात सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. या ठरावाची सभा सोमवारी (दि. 3) आयोजित केली होती. त्यापूर्वीच शनिवारी (दि. 1) सभापती जयश्री तेली यांनी राजीनामा सादर केला. 

पंचायत समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस यांची प्रत्येकी दोन, तर भाजप व ताराराणी आघाडीचे प्रत्येकी तीन सदस्य असून, सत्तास्थापनेसाठी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नसल्याने येथे सर्वांनी एकत्र येऊनच सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतला. भाजप व ताराराणी यांच्याकडे जास्त सदस्य असल्याने त्यांना सभापती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सभापतिपदाची पहिली संधी भाजपला देण्यात आली, तर उपसभापतिपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला दिली.

सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर पद बदलण्याच्या हालचाली न झाल्याने सदस्यांमध्ये चर्चा होऊन अखेर सभापतींविरोधात अविश्‍वासाचा ठराव दाखल झाला. या कालावधीत भाजपने अविश्‍वासाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यामध्ये यश आले नाही. ताराराणी आघाडीचे तीन सदस्य संपर्काबाहेरच असल्यामुळे भाजपच्या प्रमुखांची कोंडी झाली. अखेर सभापतींनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत सोपस्कार पूर्ण करत राजीनामा सादर केला आहे. सभापतिपदासाठी विजय पाटील व उपसभापतिपदासाठी विद्याधर गुरबे यांच्या नावाची चर्चा आहे.

दै. ‘पुढारी’नेच दिले राजीनाम्याचे वृत्त...

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पंचायत समितीच्या घडामोडींबाबत 
दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम वृत्त दिले असून, आज, शनिवार (दि. 1) च्या अंकात सभापती अविश्‍वास ठरावाला सामोरे जाणार नसून, त्याऐवजी राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आज सभापतींनी राजीनामा दिल्याने 
दै. ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले आहे.