Sun, Jun 16, 2019 12:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका

सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:00AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

शिक्षकांच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (टी. ए. आय. टी.) ऑनलाईन परीक्षा 12 ते 17 डिसेंबरपर्यंत घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दुसर्‍या बॅचच्या विद्यार्थ्यांना वेळ अपुरा दिल्याच्या कारणावरून गोंधळ होऊन पुनर्परीक्षा घेण्यात यावी, यासाठी उमेदवारांनी ठिय्या मांडला होता. ही परीक्षा आरसेस इन्फोटेक प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या वतीने कागल येथील एका सेंटरवर घेण्यात येत आहे. या परीक्षेला राज्यभरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले आहेत. गोेंधळ वाढल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

परीक्षेच्या वेळी आपल्यावर अन्याय झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी याबाबतचे निवेदन केंद्रप्रमुखांना तसेच पोलिसांना दिले. या ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या जिल्ह्यातील ‘केआयटी’ कॉलेज कोल्हापूर, बी मॅट विकासवाडी, संजय घोडावत अतिग्रे, भारती विद्यापीठ कंदलगाव, संजीवनी इंजिनिअरिंग पन्हाळा या पाच केंद्रांवर सुरू आहेत. या परीक्षेसाठी राज्याच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने परीक्षार्थी आले आहेत. काही परीक्षार्थी आपल्या मुलां-बाळासह आले आहेत.  सकाळी आठ ते दहा या वेळेत पहिली बॅच सुरळीत पार पडली.

दुसरी बॅच दुसर्‍या हॉलमध्ये दहा वाजता सुरू करण्यात आली होती. सव्वा दहाच्या बॅचचा सर्व्हर काही काळानंतर बंद पडला. याबाबत कंपनीच्या नियंत्रकाने संगणक चालू ठेवूनच रिफ्रेश करण्याच्या सूचना दिल्या. तथापि, संगणक सुरूच झाला नाही. सुरुवातीला स्क्रीनवर अस्पष्ट प्रश्‍न दिसत होते. त्यावेळी वेळ ही पुढे सरकत होती. वीस मिनिटे सर्व्हर सुरूच झाला नाही. वेळ संपल्यानंतर मात्र परीक्षार्थींना हॉलच्या बाहेर जाण्याची सूचना कंपनीच्या वतीने करण्यात आली. याबाबत परीक्षार्थींनी पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली. मात्र, कंपनीने त्यास नकार दिल्यामुळे गोंधळास सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाने कागल पोलिसांना पाचारण करण्यात आले.

संबंधित परीक्षार्थींनी आपले गार्‍हाणे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कंपनीकडून माहिती घेतली. मात्र, कंपनीने पोलिसांना कंपनीने चुकीची माहिती सांगितल्याचा आरोप काही परीक्षार्थींनी केला. याबाबत परीक्षार्थींनी प्रशासनाकडे आपली कैफियत मांडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 30 ते 40 मिनिटे वाया गेली. सदर परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अधिकारी अमर पाटील यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली. परंतु, सदरची जबाबदारी घेण्यास ते तयार नाहीत. तरी त्या दोषी अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई होऊन आम्हा सर्वांना वाया गेलेली 30 ते 40 मिनिटे द्यावीत. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मधुमती चावरे, लक्ष्मीबाई निडागुंडे, सुक्षमा काळे, स्वाती जाधव, प्रशांत जोशी, अमर कांबळे, मधुकर सावंत यांच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.