होमपेज › Kolhapur › ‘सर्व्हर डाऊन’मुळे  सात-बाराचा फज्जा!

‘सर्व्हर डाऊन’मुळे  सात-बाराचा फज्जा!

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:14AMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाईन सात-बारा तयार करण्यात आघाडीवर असणार्‍या आजरा तालुक्यात लिंक फेल व सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन सात-बारा वेळेत मिळेनासे झाले आहेत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया, सेवा संस्थांकडून पीक कर्जवाटप याकरिता लागणारे दाखले देताना तलाठीवर्गाची धावपळ होत आहे. 

अनेक गावांमध्ये रेंज नाही, तलाठ्यांकडे प्रिंटर नाही, तर बसावयास कार्यालयही नाही, अशी अवस्था असल्यामुळे गेले आठ ते दहा दिवस ऑनलाईन सात-बारा योजनेचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. बहुतांशी तलाठ्यांकडे स्वमालकीचे लॅपटॉप आहेत. परंतु, ज्या सज्जात काम करतात त्या सज्जामध्ये नेट कनेक्टिव्हिटी, प्रिंटर उपलब्ध नसल्याने आजरा येथे असणार्‍या महिलाभवनमध्ये एकाच प्रिंटरवर उतारे काढण्यासाठी तलाठ्यांची गर्दी होत आहे. संबंधित गावांमध्ये उतारे देणे शक्य नसल्याने नागरिकांची मागणी लिहून घेऊन दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी उतारे दिले जात आहेत.

तालुक्यात ऑनलाईन सात-बाराचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर डिजिटल सात-बाराचे काम 60 टक्के इतके पूर्ण झाले आहे. सह्यांचे डिजिटल सात-बारा (डी.एस.पी.) हे सॉफ्टवेअर स्पेस वाढविण्याच्या कारणास्तव चार दिवस बंद आहे. ऑनलाईन सात-बारा नसताना किमान तलाठ्यांना गाठून हस्तलिखित सात-बारा तरी वेळेत मिळत होते. तलाठी झेरॉक्सचा वापर करून ते तातडीने देत होते. शासनाने सहजरीत्या व अद्ययावत माहितीच्या नोंदी असणारे सात-बारा देण्याच्या उद्देशाने ते ऑनलाईन व डिजिटल स्वाक्षरीसह देण्याकरिता गेली दोन वर्षे जोरदार तयारी केली आहे. परंतु, या तयारीला लिंक फेल, सर्व्हर डाऊन व सर्व्हरची गती कमी होण्याचा अडथळा कायम आहे.