Fri, Dec 13, 2019 01:01होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांचे निधन

ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांचे निधन

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 12:00PM
कोल्हापर : प्रतिनिधी  

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पिस्टन आणि बेअरिंग क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ उद्योगपती राम कृष्ण मेनन यांचे बुधवारी सकाळी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक वाटचालीचा चालता-बोलता ज्ञानकोश अस्ताला गेला आहे. प्रयोगशील उद्योजकांच्या पिढीतील आणखी एक व्यक्‍तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्यावर कसबा बावडा येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कोल्हापुरातील उद्योग विश्‍वाचा ज्ञानकोष हरपला, अशा शब्दांत मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे. गेले काही दिवस राम मेनन हे आजारी होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी 

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक 

डॉ. प्रतापसिंह जाधव, शाहू महाराज, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर कोल्हापूरचे नाव ज्यांनी कोरले, अशा उद्योगपतींच्या साखळीतील ते एक होत. 

कोल्हापूर हीच कर्मभूमी

मूळचे केरळचे असलेले मेनन हे कोल्हापूरचेच झाले. मेनन यांचे मूळ गाव केरळमधील श्रीनारायणपूरम हे आहे. दि. 25 फेब—ुवारी 1930 रोजी केरळमधील पण्णगड येथे राम मेनन यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण तसेच तंत्रशिक्षणाची पदवी कोडुंगलूर येथे घेतली. मात्र, कोल्हापूर हीच त्यांंची कर्मभूमी राहिली. 1951 मध्ये फौंड्री उद्योगात चंद्रन आणि राम मेनन यांनी आपली कारकीर्द सुरू केली. नवनवे प्रयोग करणे व सातत्याने नावीन्याचा शोध घेणे, यातूनच त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून झेप घेतली नाही, तर जगात आपल्या उत्पादनांचा ठसा उमटवला. आयातीला पर्यायी ठरतील, अशी उत्पादने तयार करून परकीय चलनाची बचत केली. सुरुवातीला सिलिंडर हेड व ब्लॉक्स, पिस्टन आणि रिंग उत्पादनाला सुरुवात केली. अत्यंत अवघड अशा अ‍ॅल्युमिनियममध्ये डायकास्ट कॉम्पोनंट्स तयार करण्यामध्ये त्यांनी झेप घेतली. 

अंगभूत कौशल्य, अथक मेहनत

देशी तंत्रज्ञानावर आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवून औद्येागिक क्षेत्रात मेनन यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला. राम मेनन यांनी मेनन उद्योगांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. मेनन उद्योग समूहाने सुमारे साडेचार हजार लोकांना प्रत्यक्ष तर अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. अंगभूत कौशल्य, अथक मेहनत करण्याची तयारी, हे त्यांच्या यशाचे गमक होते. एकूण उत्पादनापैकी 30 ते 35 टक्के उत्पादने ही 24 देशांत निर्यात होतात, अशी जागतिक तोडीची गुणवत्ता निर्माण केली. 

उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न

मेनन उद्योग समूहाच्या ग्रुपचा  मेनन अँड मेनन, मेनन पिस्टन, मेनन पिस्टन रिंग्ज, मेनन एक्स्पोर्ट, मेनन बेअरिंग, मेनन अ‍ॅलकॉप, एम.बी. एक्स्पोर्ट असा मोठा विस्तार आहे. जगाच्या वाहन उद्योगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव सातत्याने गाजवत ठेवण्याची जबाबदारी मेनन यांनी पार पाडली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, डिझेल इंजिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, स्मॅक या  औद्योगिक संस्थांमध्ये अध्यक्षपद भूषवताना राम मेनन यांनी देशभरातील नामवंत उद्योपगपतींना निमंत्रित करून, त्यांच्या अनुभव आणि प्रगतीचा लाभ स्थानिक उद्योजकांना व्हावा, यासाठी प्रयत्न केले. केवळ औद्येागिकच नव्हे, तर विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 

अनेक संस्थांचे आधारवड

राम मेनन केआयटी संस्थेचे संस्थापक होते. तसेच त्यांनी केआयटीचे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषविले होते. खासगी शिक्षण संस्थांच्या गव्हर्निंग कौन्सिलचे ते अध्यक्ष होते. सीआयआय या संस्थेचे कौन्सिल मेम्बर व महाराष्ट्र सीआयआयचे ते अध्यक्ष होते. इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचेही ते सदस्य होते. कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ते संस्थापक, संचालक होते.

कोल्हापूरच्या विकासासाठी आग्रही

बालकल्याण संकुल संस्थेचे ते विश्‍वस्त होते. रोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष, अंध कल्याण संघाचे उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. कोल्हापूर जागतिक नकाशावर आले पाहिजे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. कोल्हापूरच्या उद्योग विकासात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या उद्योग समूहात आज साडेचार हजारांवर कर्मचारी काम करत असून, या उद्योगाच्या माध्यमातून अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या विभागातील सर्वोच्च करदाता म्हणूनही त्यांचा उल्‍लेख केला जातो.
द प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँकेची सूत्रे अनेक वर्षे राम मेनन यांच्या हाती होती. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यासह अन्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मदतीचा हात दिला. अंधकल्याण संघाचे ते उपाध्यक्ष होते.

विविध पुरस्कारांचे मानकरी

मेनन यांच्या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूर महापालिकेने त्यांना ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने गौरवले. त्याचबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमन व इचलकरंजीच्या फाय फौंडेशनने त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने केईए उद्येागश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. जाधववाडी येथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. 

यावेळी सतीश घाटगे, बाळ पाटणकर, कांतिलाल चोरडिया, बाबाभाई वसा, पद्माकर सप्रे, बापू नाडकर्णी, आर. डी. दीक्षित, ऋतुराज इंगळे, मधुरिमाराजे, उद्योजक अतुल आरवाडे, राजू पाटील, व्ही. बी. पाटील, जयदीप मांगोरे, सुमित चौगुले, संजय पाटील, संजय शेटे, आनंद माने, दिनेश बुधले, प्रदीप कापडिया, सुरेंद्र जैन, शिवाजीराव पोवार, उदय दुधाणे, देवेंद्र दिवाण व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम मेनन यांच्या पश्‍चात पत्नी राधामणी, सचिन व नितीन ही मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.