Sat, Feb 16, 2019 13:09होमपेज › Kolhapur › प्रश्‍न पाठवा, लोकसभेत मांडू : खा. महाडिक

प्रश्‍न पाठवा, लोकसभेत मांडू : खा. महाडिक

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्‍न मी लोकसभेत मांडून ते  सोडवण्याचा प्रयत्न केला आहे; पण युवक व विद्यार्थ्यांच्या मनात अजून काही प्रश्‍न असतील तर त्यांनी ते मला पाठवावेत. हे प्रश्‍न लोकसभेत मांडू, असे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्कृष्ट प्रश्‍न विचारणार्‍या विद्यार्थी, युवकांना दिल्ली येथे नेऊन संसदेचे कामकाज पाहण्याची संधी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

या योजनेची माहिती देताना महाडिक म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांत संसदेत 884 प्रश्‍न विचारले आहेत. संसदेच्या चर्चेत 46 वेळा सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत; पण मतदारसंघात युवकांच्या दृष्टीने अजूनही काही महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. ते समजण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, युवक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात यासाठी तयार करण्यात आलेले फॉर्म पाठवणार आहे. अंदाजे 1 लाख विद्यार्थी यात सहभागी होतील.  लकी ड्रॉद्वारे चांगले प्रश्‍न विचारलेल्या विद्यार्थ्यांची दिल्ली दौर्‍यासाठी निवड करण्यात येणार आहे. मतदारसंघातील तालुका व शहरातील प्रत्येक पाच जणांचा यात समावेश असणार आहे,  असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामराजे कुपेकर उपस्थित होते.