Fri, Apr 26, 2019 10:04होमपेज › Kolhapur › तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असूनही खुलेआम विक्री

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असूनही खुलेआम विक्री

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:06PMकोल्हापूर : पूनम देशमूख

तंबाखू , गुटखा, सिगारेटमुळे कॅन्सर होत असल्याचे सर्वज्ञात असूनही या उत्पादनांच्या विक्रीत घट झालेली नाही. गुटखा आणि सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी असूनही ही उत्पादने बाजारात राजरोस विकली जात आहेत.  मृत्यू होण्याच्या सहा कारणांपैकी तंबाखू खाणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तंबाखूमुळे दर सहा सेकंदाला एक व्यक्‍ती मृत्यू पावते. तंबाखूमध्ये निकोटीनसह चार हजार पेक्षा जास्त विषारी रासायनिक घटक आहेत. चाळीस टक्क्यांपर्यंत कर्करोगजन्य पदार्थ तंबाखूमध्ये आहेत.

तंबाखू विरोधात कायदा अस्तित्वात असला, तरी त्यासंदर्भात हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होत नाही. तंबाखूच्या निमूर्लनासाठी सामाजिक समर्थनाची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने एका आदेशान्वये सुगंधित तंबाखू, सुपारी, पानमसाला व गुटख्याचे उत्पादन , विक्री, साठवणूक, वाहतूक व वितरणावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही या प्रतिबंधित वस्तूंची राजरोसपणे विक्री होत आहे. 

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, रक्‍तवाहिन्यांशी संबंधित आजार जडतात. देशात दरवर्षी सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूच्या व्यसनाने होतो. या पदार्थांचे सेवन करणार्‍यांमध्ये तरुणाईचा सहभाग मोठा आहे. 

तंबाखुजन्य पदार्थ सेवन  विरोधी पथके आहेत कुठे ?

प्रत्येक जिल्ह्यात तालुका, ग्राम स्तरावर तंबाखूजन्य पदार्थ सेवनविरोधीे अमंलबजावणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रातील डॉक्टरांसह पोलिस प्रशासनातील कर्मचार्‍यांचाही समावेश असतो. यानुसार तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यास दंड आकारत त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कोल्हापुरात ही अमंलबजावणी पथक नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. 

आजपासून जनजागृती

तंबाखू आणि ह्दयरोग या थिमनुसार यंदाचा तंबाखू विरोधी जागतिक दिन साजरा होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व शासकीय कार्यालयांत जनजागृतीपर तंबाखू व्यसनाविरोधाबाबत शपथ घेतली जाणार आहे. गुरुवार दि. 31 मे ते 6 जूनअखेर तंबाखू विरोधी सप्‍ताह आयोजित करण्यात आला असून, याअंतर्गत बुधवारी (दि. 5 जून) ह्दयरोग व मौखिक कर्करोग शिबिर उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात येणार आहे.