Sun, Mar 24, 2019 08:50होमपेज › Kolhapur › दररोज पन्‍नास यंत्रमागांची भंगारात विक्री : प्रकाश आवाडे 

दररोज पन्‍नास यंत्रमागांची भंगारात विक्री : प्रकाश आवाडे 

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:13AMइचलकरंजी : वार्ताहर

केंद्र व राज्य शासनाकडून केवळ आश्‍वासनांचीच गाजरे दाखविल्याने इचलकरंजीतील वस्त्रोद्योग डबघाईला आला आहे. उद्योग रसातळाला गेला असून साध्या यंत्रमागासह शटललेस लूमसुध्दा भंगारात घातले जात आहेत. त्याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारचे धोरण व अक्षम्य दुर्लक्षपणा जबाबदार आहे. सरकारच्या धोरणामुळे दररोज सुमारे 50 यंत्रमाग भंगारात घातले जात असल्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

उद्योगातील मंदी, नोटीबंदी आणि जीएसटीमधील किचकट प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आलेला यंत्रमागधारक हवालदिल झाला आहे. शासनाकडून मदतीचा हात दिला जात नसल्याने शहर व परिसरातील अनेक यंत्रमागधारकांनी अक्षरश: भंगारात यंत्रमाग विकण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण परिस्थितीची माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन्याची गरज असताना 123 घटकांना एकत्र करुन शासनाने खिल्लीच उडविली आहे, अशी टिका आवाडे यांनी केली. 

आवाडे म्हणाले, वस्त्रोद्योगाला पुनर्जीवन मिळावे यासाठी विविध संघटनांनी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलने केली. परंतु त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण राबविले जात नसल्याने यंत्रमाग व्यवसाय संकटाच्या गर्तेत रुतत चालला आहे. कामगाराचा मालक बनलेला कारखानदार आता पुन्हा कामगार बनत आहे हे शहरासाठी दुर्दैवी आहे.

यंत्रमाग व्यवसायासाठी आवश्यक वीज दरात आणि व्याजदरात सवलत देण्याची घोषणा करुन जवळपास दोन वर्षे लोटत आली. पण प्रत्यक्षात अंमलबजावणीची चिन्हेही दिसत नाहीत. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी शहरातील आंदोलनास भेट देऊन वीज दरातील सवलतीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले. आणि विद्यमान लोकप्रतिनिधीने जणू सवलत मिळल्याच्या आनंदात साखर वाटली. त्यामुळे यंत्रमागधारकही निश्‍चितपणे पदरात काही तरी पडेल या आशेने डोळे लावून बसला होता. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. केवळ घोषणा करणे आणि साखर वाटणे हे एकमात्र काम सरकार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी करीत आहेत. यावेळी जि.प.सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुनिल पाटील, राजू बोंद्रे आदी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : जाजू

वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी वीज दर कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू त्यांनी ते आश्‍वासन पाळले नाही. ते मंत्रीमंडळातील वजनदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आश्‍वासन देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी यंत्रमागधारकांची माफी मागावी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष मिश्रीलाल जाजू यांनी पत्रकाद्वो केली आहे. 
आज इचलकरंजीतील यंत्रमाग 50 टक्के बंद आहेत.

आठवड्यातील तीन दिवस सुरू आणि तीन दिवस बंद अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे. कापडाच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कापडाला मागणी आहे. यंत्रमाग व्यवसाय व्यवस्थित चालावा यासठी सातत्याने या व्यवसायासाठी वीज दर कमी करावेत अशी मागणी होत आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये वीजदर महाराष्ट्रापेक्षाही कमी आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंत्री देशमुख यांनी वीजदर कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पाळले नसल्याचे पत्रकात नमूद केले आहे.