Sat, Jul 20, 2019 02:15होमपेज › Kolhapur › आमचं घर विका; पण रस्ता करा!

आमचं घर विका; पण रस्ता करा!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:15AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न चांगलाच गाजला. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरून गोंधळ घातला. नगरसेविका सौ. मेहजबीन सुभेदार यांनी तर खड्डेमय रस्त्यांमुळे प्रभागातून फिरणे मुश्किलीचे झाले आहे, असे सांगून ‘साहेब, आमचं घर विका; पण रस्ता करा!,’ अशी विनवणी सभागृहात अधिकार्‍यांकडे केली. त्यामुळे सभागृहातील अधिकार्‍यांसह नगरसेवकही अवाक् झाले. काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी निधी आणण्याची जबाबदारी कोणाची, असे म्हणून अधिकार्‍याना जाब विचारला. 

प्रा. जयंत पाटील यांनी 108 कोटींच्या नगरोत्थान योजनेचा रस्ते प्रकल्प कधी संपणार, अशी विचारणा केली. सौ. अश्‍विनी रामाणे यांनी हॉकी स्टेडियमपासून कळंब्याकडे जाणारा रस्ता अद्यापही अपूर्ण असून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. सौ. उमा बनछोडे यांनी पापाची तिकटी ते गंगावेस हा रस्ता गेल्या वर्षी केल्यानंतरही यावर्षी त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आणले. परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, सौ. अश्‍विनी बारामते यांनीही रस्त्यांचे प्रश्‍न उपस्थित केले. प्रा. पाटील व देशमुख यांनी टास्कच्या नावाखाली नगरसेवकांचे निधी खर्च करण्याचे अधिकार आयुक्त काढून घेत असल्याचा आरोप केला. 

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, 108 कोटींच्या नगरोत्थान प्रकल्पात सुरूवातीला 50 टक्के हिस्सा शासनाचा व 50 टक्के हिस्सा महापालिकेचा होता. परंतू नंतर तो हिस्सा 70-30 असा झाला. त्यामुळे 22 कोटींचा निधी हा मूळ प्रस्तावानुसार खर्च करावा लागणार आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी, नगरोत्थान योजनेसाठी चार पॅकेज होते. त्यापैकी दोन पॅकेजचे काम पूर्ण झाली आहेत. अद्यापही फुलेवाडी रिंगरोड, जवाहरनगरजवळील यल्लम्मा मंदिराकडील रस्ता, एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, लक्ष्मीपुरी आदी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासह इतर कामांसाठी सुमारे 10 ते 11 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे सांगितले. त्यावर प्रा. पाटील यांनी मग उर्वरीत 11 कोटींचे काय करणार अशी विचारणा केली. त्यावर देशमुख, सुभेदार यांच्यासह इतर नगरसेवकांनी त्यातून आवश्यक रस्ते करावेत, अशी सूचना मांडली. उपमहापौर महेश सावंत, रत्नेश शिरोळकर, सौ. रुपाराणी निकम यांनीही रस्ते व ड्रेनेजसंदर्भात प्रश्‍न उपस्थित केले.  

धनंजय खोत सभागृहात खोटे बोलतात...

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. 2 जुलैला त्याची सुनावणी होती. परंतू महापालिकेच्या वकिलांनी चार आठवड्याची मुदत मागितली. वास्तविक महापालिकेची बाजूने आतापर्यंत सर्व निकाल झाले आहेत. महापालिकेची बाजूही वरचढ आहे. मग महापालिकेने मुदत मागून माघार का घेतली? अशी विचारणा प्रा. जयंत पाटील यांनी केली. सुनावणी कधी आहे ते माहिती असुनही महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने माहिती संकलित केली नाही. त्यामुळे यासाठी सर्वोतोपरी नगररचना विभाग दोषी असल्याचा सांगुन सहायक संचालक धनंजय खोत हे सभागृहात खोटे बोलत असल्याचा आरोपही केला. 

अमृत योजनेच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी कोल्हापूर शहरात अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या ड्रेनेज कामांचा प्रश्‍न उपस्थित केला. कामासाठी खोदाईमुळे चांगले रस्ते खराब होत आहेत. त्यातच आता पाईपलाईन टाकण्यासाठी पुन्हा खोदाई होणार. त्यामुळे रस्त्यांचा वाट लागत असल्याचे सांगत संबंधित ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? असा आरोप केला. संबंधित ठेकेदार महापालिका अधिकार्यांना जुमानत नसल्याचे सांगुन त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही केली. जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी ठेकेदाराने कामासाठी डिपॉझिट भरली असून त्यातून कामे करून घेता येईल, असे सांगितले.