Tue, Apr 23, 2019 01:52होमपेज › Kolhapur › पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद

फिश ६५, दाल बाटी, बिर्याणी अन् बरंच काही

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

झणझणीत मिसळ अन् तांबडा-पांढरा रस्सा, चटपटीत पाणीपुरी अशा सर्व परिचित पदार्थांबरोबरच कोकणी फिश 65, फिश टिक्‍की, टर्किश चिकन, हैद्राबादी व लखनवी बिर्याणी, राजस्थानी दाल बाटी, स्मोक बिस्किटे, बास्केट चाट, अशा नवनवीन पदार्थांनी सजलेल्या ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला शनिवारी खवय्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. मनसोक्‍त खरेदीसोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरकरांची रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळली होती.

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम.तर्फे आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला राहणार आहे. फेस्टिव्हलसाठी रॉनिक वॉटर हीटर सिस्टीम आणि पितांबरी रुचियाना हे सहप्रायोजक आहेत.

नाताळ सणानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी पडली आहे. चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांनाही सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद कोल्हापूरकरांनी शनिवारी फेस्टिव्हलमध्ये सहकुटुंब साजरा केला. सकाळपासूनच फेस्टिव्हलमध्ये खरेदी व विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाचनंतर अख्खं मैदान गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येक स्टॉलवर गर्दी उसळली होती. 

‘पुढारी शॉपिंग अँड फेस्टिव्हल’मध्ये नानाविध पदार्थांची रेलचेल आहे.  पॉपकॉन ग्रिल, ग्रीन तवा सुरमई, कोळंबी फ्राय, व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज, हॉट डॉग, बार्बेक्यू चिकन, थाई स्टाईल चिकन, दाल पक्‍वान, सोया चिली, चॉकलेट सँडवीच, वडा कोंबडा, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर, डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, पप्स, चीज, व्हेज पुलाव, सोबत सोलकढी, आईस्क्रीम आणि पानातील विविध प्रकार आदी  पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. स्टॉलवर ऑर्डर दिल्यानंतर पाच मिनिटांतच मिळणारे गरमागरम पदार्थ आणि एकत्र बसून जेवणाची बैठक व्यवस्था असल्याने हजारो कोल्हापूरकरांची पावले मैदानाकडे वळत आहेत.

व्यावसायिक स्टॉलमध्ये टिकलीपासून ते खेळण्यापर्यंत, घरापासून ते ऑफिसपर्यंत लागणार्‍या विविध नामांकित वस्तू आहेत. गॅस शेगडी, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्यांचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, पिकनिक टेबल, सार्थ आयुर्वेदिक, सरस्वती चहा, विंकिंज, लहान मुलांसाठी होम रिव्हाईज आदी स्टॉलवर ऑफर्सची बरसात करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेत मनसोक्‍त खरेदी करत लोक समाधानाने बाहेर पडत होते.