Sat, Jul 20, 2019 15:19होमपेज › Kolhapur › विनापरवाना दारू दुकानांचा शोध सुरू 

विनापरवाना दारू दुकानांचा शोध सुरू 

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 10:10PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महामार्गापासून 500 मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. तेरा महिन्यानंतर तो आदेश शासनाने मागे घेतला. त्यामुळे मूळ ठिकाणी असलेली दारूची दुकाने सुरू झाली. तर काही विक्रेत्यांनी पूर्वीचे ठिकाण आणि स्थलांतरित ठिकाण अशा दोन्ही ठिकाणी दारू दुकाने सुरू ठेवली आहेत, अशा दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले. 

महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारूची दुकाने बंद झाली. यासंदर्भात राज्य शासनाने 16 डिसेंबर 2017 रोजी आदेश काढला. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. तसेच जे दारू दुकानदार 500 मीटरच्या बाहेर दुकान स्थलांतरित करण्यास तयार आहेत, त्या परिसरात धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय नसावे, या अटी कायम ठेवून इतर अटी न लावता, दारू दुकाने स्थलांतर करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, असे आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या तत्कालीन आयुक्‍तांनी दिले होते. त्यावेळी बिअर बार वगळून जिल्ह्यातील 70 टक्के देशी आणि विदेशी दारूची दुकाने 500 मीटरच्या बाहेर स्थलांतरित झाली होती. काही ठिकाणी बिअर बार मालकांनीही 500 मीटरच्या बाहेरील जागेवर बार सुरू केले. 

दरम्यान, यासंदर्भात दारू विक्रेत्यांनी न्यायालयात विनंती याचिका दाखल करून खटला सुरू केला. यावर सुनावणी झाली. शासनानेही न्यायालयात आपले म्हणणे सादर केले. अखेर न्यायालयाने शासनाने निर्णय घ्यावेत, असे आदेश दिले. त्यानंतर टप्पाटप्याने 500 मीटरची अट शिथिल करत महामार्गावरील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. ज्या दुकानदारांनी दुकान स्थलांतरित न करता बंदच ठेवले होते, त्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी शासनाकडून आदेश मिळताच त्यांनी ती सुरू केली. तसेच ज्यांनी 500 मीटरच्या बाहेर दुकाने सुरू केली होती, त्यांनी मूळ जागेवर दुकान सुरू करण्यासाठी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून खात्याच्या परवानगीने दुकाने सुरू केली; पण जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी देशी आणि विदेशी दारूची दुकाने स्थलांतरित आणि मूळ ठिकाण अशा दोन्ही ठिकाणी सुरू असल्याचे समजते.  

अनेक प्रस्ताव दाखल

शासनाच्या आदेशाने 500 मीटरच्या आतील दारूची दुकाने बंद झाली. त्यानंतर ही बंद मागे घेतली आहे. ज्या दुकानदारांनी बंदच्या काळात दुकाने स्थलांतरित केली. त्यांनी मूळ जागेवर दुकान सुरू करण्यासाठी परवाना मिळावा, म्हणून प्रस्ताव पाठवला आहे, असे अनेक प्रस्ताव कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. याशिवाय ज्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यांनी आपल्या मूळ जागी दुकान सुरू केले आहे की नाही, स्थलांतरित ठिकाणाचे दुकान बंद झाले का, याबाबत शोध सुरू आहे.

 - गणेश पाटील, जिल्हा अधीक्षक