होमपेज › Kolhapur › रिक्त पदांमुळे शाळांची दमछाक

रिक्त पदांमुळे शाळांची दमछाक

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:10AMहमीदवाडा : मधुकर भोसले 

कागल तालुक्यामध्ये प्राथमिक शाळांच्या बाबतीत ई-लर्निंगसारख्या संकल्पनांमुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला आहे. त्यामुळे खासगी व इंग्रजी माध्यमातून दोनशेच्या आसपास मुले प्राथमिककडे दाखल झाली आहेत. मात्र, शाळा सुरू होऊन एक महिना होत आला, तरी तालुक्यातील सहायक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी अशी मिळून एकूण 91 पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असणार्‍या शिक्षकांवर अधिक जबाबदारी पडत असून, काही ठिकाणी एकाचवेळी दोन वर्ग एकत्र करून शिकवावे लागत आहे. यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

कागल तालुक्याचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रयत्न व प्रयोग सुरू आहेत. असे असताना मेमध्ये झालेल्या बदल्यांमुळे काही शाळांना त्याचा चांगला लाभ झाला. तर काही शाळांमध्ये मात्र तब्बल चार-चार पदे रिक्त आहेत. शाळा सुरू होऊन एक महिना होत आला आहे. अभ्यासक्रम गती घेत आहे. अशावेळी आता ही रिक्त पदे मात्र त्रासदायक ठरत आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यातील 20 शाळांमध्ये मुख्याध्यापकांची 20 पदे, तर केंद्रप्रमुखांची 8 पदे रिक्त आहेत, तसेच अध्यापकांची 47 शाळांमधून 47 पदे रिक्त आहेत. तर 16 शाळांमध्ये 16 पदवीधर आवश्यक आहेत. 

बदलीवेळी जिल्हा स्तरावरील समानीकरणाच्या निर्णयाचा हा परिणाम आहे. सर्वच तालुक्यांतील रिक्त पदे ही उपलब्ध शिक्षकांच्या प्रमाणात समान ठेवण्याची भूमिका यावेळी प्रशासनाने घेतली. त्यामुळे अध्यापकांची 7 टक्के, पदवीधरांची 9 टक्के व मुख्याध्यापकांची 29 टक्के पदे ही प्रत्येक तालुक्यात रिक्त ठेवावी लागली. त्यामुळे जिल्हा पातळीवर जवळपास 700 पदे रिक्त राहिली आहेत.