Mon, Jul 22, 2019 03:12होमपेज › Kolhapur › गरिबांचे शिक्षण बंद करू देणार नाही 

गरिबांचे शिक्षण बंद करू देणार नाही 

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘काहीही झाले तरी शासनाला गरिबांचे मोफत व सक्‍तीचे शिक्षण बंद करू देणार नाही, शिक्षणाचे खासगीकरण करू देणार नाही. राज्यातील सर्वसामान्यांचे शिक्षण उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडू या,’ अशी प्रतिज्ञा हजारो शालेय विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 3) दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतली.

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने 1,300 शाळा बंद करणे व खासगी कंपन्यांना शाळा चालविण्यास परवानगी देण्याच्या निर्णयास विरोध म्हणून एल्गार पुकारला आहे. शनिवारी शहरातील माध्यमिक शाळांमधील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सकाळी नऊच्या सुमारास दसरा चौकात जमण्यास सुरुवात झाली. दहा वाजता मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. ‘देश वाचवा, शिक्षण वाचवा, गरिबांचे शिक्षण बंद करणार्‍या शासनाचा धिक्‍कार असो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

यावेळी नेहा पाटील (उषाराजे गर्ल्स हायस्कूल),   गुलनाज पठाण (राजाराम हायस्कूल, कसबा बावडा),   अक्षरा सौंदलगे (वालावलकर हायस्कूल), स्वाती थोरात (भाई माधवराव बागल कन्या प्रशाला), वैष्णवी परीट    (राजाराम हायस्कूल) यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्‍त केले.  

कंपनी प्रॉडक्ट तयार करणार आहात काय?

शासन रोज शिक्षण क्षेत्रातील निर्णय बदलत आहे. खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देणारे विधेयक संमत केले आहे. या निर्णयामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही. कंपनीच्या शाळांमधून प्रॉडक्ट तयार करणार आहात काय? असा सवाल विद्यार्थिनींनी उपस्थित केला. 

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

छत्रपती राजाराम हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, इंदुमती गर्ल्स हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल, एम.एल.जी. गर्ल्स हायस्कूल, विक्रम हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल, भाई माधवराव बागल कन्या प्रशाला, राजमाता जिजामाता हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, नेहरू हायस्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शासन गाजर दाखवून शेतकरी व शैक्षणिक क्षेत्राची फसवणूक करीत आहे, असे प्रबोधनात्मक फलक गळ्यात अडकविलेल्या अक्सा आजरेकर व आफिफा आजरेकर या चिमुरडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

कँडल मार्च...काळ्या फिती लावून काम

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने पुढील आठवड्यात शिक्षकांचा कँडल मार्च काढण्यात येणार आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.  

शिक्षण वाचवा कृती समिती आणि विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. कृती समितीचे अशोक पोवार यांनी शपथ व प्रतिज्ञा दिली. दादासाहेब लाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, भरत रसाळे, राजाराम वरुटे, लालासाहेब गायकवाड, सुधाकर सावंत, रघुनाथ मांडरे,  सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.