Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शाळकरी मुलांचे धोकादायक मोबाईलचे ‘व्यसन’

शाळकरी मुलांचे धोकादायक मोबाईलचे ‘व्यसन’

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:21AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विजय पाटील 

अंकुर (नाव बदलले आहे) नववीत शिकत होता. अचानक त्याने शाळा सोडली. आई-वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र मी मोबाईल गेममध्ये सर्वात जास्त स्कोअर करतोय. मी त्यातील टॉप स्टार आहे. म्हणून मला शाळेची गरज नाही, असे म्हणून त्याने शाळेला रामराम केला. सुंदर (काल्पनिक नाव) अठवीत शिकतो. आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्याने घरातील टीव्हीच फोडला. सध्या या दोघांचे कौन्सिलिंग सुरू आहे. पालक चिंतेत आहेत. ही कोल्हापूरच्या आसपासची प्रातिनिधिक वास्तव उदाहरणे आजच्या मुलांचे मोबाईल व्यसन दाखवण्यास पुरेशी आहेत. ‘युनिसेफ’च्या जाहीर झालेल्या अहवालातूनही  मोबाईलच्या अतिवापराच्या दुष्परिणामाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

शाळेत चोरून मोबाईल घेऊन जाण्याचे प्रकार सर्रास दिसतात. शाळेतून घरी आल्यावर तर मोबाईलमधील गेम्स आणि सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत टाईमपास असे विचित्र जगणे बहुतांशशाळकरी विद्यार्थ्यांचे बनू लागले आहे. यामुळे अशी मुले अभ्यासात मागे पडत आहेत किंवा एकलकोंडी होत आहेत. त्यांना आभासी जगात (व्हर्च्युअल) रममान होणे आवडू लागले आहे. समवयस्क मित्रांबरोबर चेष्टामस्करी, खेळ आदी गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत. बहीण, भाऊ आदींसह पालकांसोबत संवाद टाळला जात आहे. ज्या वयात फुलपाखरासारखे बागडावे, अलगद जगावे असे बालसुलभ वागणे बाजूला पडू लागले आहे. फक्त मोबाईलमध्ये तोंड घालून गेममधील बंदुकीच्या फैरी झाडणे, तलवारी फिरवणे, बाईक्स, कार्स उडवणे असे काही तरी या मुलांचे सुरू झाले आहे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे हा मोबाईलचा व्हायरस वाढू लागला आहे.  मोबाईलच्या आहारी गेलेली अशी मुले शाळा सोडत आहेत. स्वत:ला जीनियस समजून आई-वडिलांशी वाद घालत आहेत किंवा नको त्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. 

‘युनिसेफ’च्या ताज्या अहवालात मुलांच्या मोबाईल वापराबाबत दुष्परिणाम दाखवून चिंता व्यक्त केली आहे. ‘लोकल टू ग्लोबल,’ अशी ही नवी समस्या बनत चालली आहे.