Fri, May 24, 2019 06:44होमपेज › Kolhapur › शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा!

शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा!

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:09PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्हा रुग्णालयासह, प्राथमिक आरेाग्य केंद्र आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरापासून विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेेक विभागांत पंधरा दिवस, तर काही ठिकाणी महिनाभर उधार-उसनवारीवर काम चालवले जाऊ शकते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पसरणार्‍या साथीच्या रोगांना या रोगांपासून बचाव करण्यासाठी सामान्यांची परवड होत आहे. 

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर इथपासून ते कोकणातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कर्नाटक परिसरातील सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार देणारे सीपीआर हे केंद्र आहे. सर्दी, तापापासून ते अगदी कॅन्सरपर्यंतचे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरमध्ये केले जातात. जिल्ह्यात कोठेही अपघात झाला, तरी उपचारासाठी रुग्णास सीपीआरमध्ये दाखल केले जाते. दररोज जवळपास 1100 ते 1200 बाह्यरुग्णांची तपासणी होते. अनेक रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते; पण सध्या येथेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाला औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा उपजिल्हा रुग्णालये आणि महापालिकेचे दवाखाने औषधांच्या कमतरतेमुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच झाली आहेत. दर्जेदार सोयीसुविधांमुळे रेबीज किंवा अन्य रोग प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी रुग्ण थेट सीपीआरमध्ये दाखल होतात; पण गेल्या दीड महिन्यापासून येथे त्याचाही वारंवार तुटवडा जाणवत आहे. तरीही सीपीआर प्रशासनाने अशा रुग्णांना मात्र वार्‍यावर सोडलेले नाही. 

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. शेजारच्या जिल्ह्याकडून औषधे मिळविण्याची नामुष्की निर्माण झाली आहे.  रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गेली दोन महिने सीपीआर प्रशासने औषधांसाठी जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हात पसरले आहेत; पण अद्याप औषधे मिळालेली नाहीत. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेकडून उसनवारीवर सीपीआरने औषधे मागणी केली आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि औषधांचा भासणारा तुटवडा यामुळे रुग्णालय प्रशासन हतबल झाले आहे. 

औषधाअभावी सीपीआरमध्ये विविध प्रकार शस्त्रक्रिया खोळंबत असून जस जसा औषधांचा पुरवठा होईल, तशा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अतितातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना स्वत: औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. प्रतिजैविकांचा साठा तर संपण्याच्या मार्गावरच आहे. सर्दी-तापाची औषधे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच शिल्लक आहेत.हाफकिन इन्स्टिट्यूटमुळेच औषधांची खरेदी खोळंबली आहे. एकंदरीत ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच शासकीय रुग्णालयांची ही अवस्था सामान्यांची परवड करणारी ठरण्याची शक्यता आहे. 

सीपीआरवर रुग्णांचा ताण 

दर्जेदार सोयीसुविधांमुळे सीपीआरने नावलौकिक मिळविला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण ताप, सर्दीची औषधे घेण्यासाठी थेट सीपीआरमध्ये दाखल होतात. कुत्रे चावल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात लस टोचण्याचे धाडस तेथील डॉक्टर करत नाहीत. ते थेट सीपीआरमध्ये जाऊन लस घ्या, असा सल्ला देतात. याचा ताण सीपीआर रुग्णालयावर पडत आहे.