होमपेज › Kolhapur › जीवनावश्यक वस्तूंची टंचाई; महागाई वाढणार

जीवनावश्यक वस्तूंची टंचाई; महागाई वाढणार

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 1:06AMकोल्हापूर  : प्रतिनिधी

देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. किरकोळ बाजारपेठेत कांदा-बटाट्याचे दर वाढत आहेत. गुरुवारी भाजीपाला आवक काहीशी मंदावली होती. दरम्यान, आदर्श युनियन टेम्पो संघटनेने शहरात काही ठिकाणी टेम्पोमधून सुरू असलेल्या माल वाहतुकीविरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन  केले.   

देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाचा गुरुवारी सातवा दिवस होता. केंद्र सरकारकडून अजूनही या बंदसंदर्भात संबंधित संघटनेशी चर्चा केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक, केरळमधून दिल्‍लीकडे जाणारी माल वाहतूक उजळाईवाडी येथे अडवण्यात आली आहे. महामार्गावर ट्रक ‘जैसे थे’ अवस्थेत थांबून आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार ट्रक या बंदमध्ये सहभागी असून, यामुळे अंदाजे सातशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प आहे.  

कांदा, बटाटा आवक बंद झाल्याने शिल्‍लक असणारा साठाही संपत आला आहे. त्यामुळे  किरकोळ बाजारपेठेतील कांदा, बटाट्याचे भाव वाढत चालले आहेत. धान्य  बाजारपेठेवर अजून त्याचा परिणाम जाणवत नसला तरी अजून दोन तीन दिवसांत धान्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. फळांची आवक बंद झाल्याने मार्केट यार्डमधील घाऊक विक्रेत्यांचे गाळे ओस पडले आहेत. 

दरम्यान, देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाला  कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो असोसिएशनने आपला पाठिंबा दर्शवला आहे. चक्‍काजाम आंदोलन सुरू असताना चोरून मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या चाकांमधील हवा सोडण्यात आली. तसेच गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात रविकिरण इंगवले, तुकाराम लांबोरे,  तानाजी पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेश खोत, शानूर मुजावर व सदस्य उपस्थित होते. देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाने पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीत घट झाली आहे. तर बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाल आहे.

पोलिस बंदोबस्तात रेशन धान्याची वाहतूक

माल वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर रेशन धान्याची पोलिस बंदोबस्तात वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मार्केट यार्डापासून तालुक्यांच्या गोदामापर्यंत गुरुवारी वाहतूक करण्यात आली. शुक्रवारी गोदामातून धान्य दुकानदारांपर्यंतची वाहतूकही पोलिस बंदोबस्तातच केली जाणार आहे.

मार्केट यार्ड येथील गोदामातून आज शिरोळ, हातकणंगले, कोल्हापुरातील गोदामात धान्य पोहोचवण्यात आले. उद्या शुक्रवारीही अन्य तालुक्यांच्या गोदामात धान्य पोहोचवले जाणार आहे. त्याचीही तयारी करण्यात आली आहे. 

दरम्यान, गोदामातून धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. जसा बंदोबस्त उपलब्ध होईल, त्यानुसार ही वाहतूक केली जाणार असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.