Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Kolhapur › अठरा कोटींच्या टीडीआरमध्ये घोटाळा

अठरा कोटींच्या टीडीआरमध्ये घोटाळा

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:32AMकोल्हापूर :प्रतिनिधी - 

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जागेसाठी देण्यात आलेल्या 18 कोटींच्या टीडीआरमध्ये आर्थिक घोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी हरकती विचारात न घेता न्यायालयाचा अवमान करून टीडीआर दिला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या टीडीआरची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेने संबंधितांना टीडीआर देण्याची नोटीस  दिली होती. त्यानुसार स्वतः आपण तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी तत्कालीन आयुक्‍तांनी नगररचना विभागातील सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाने 31 जुलै 2014 ला टीडीआरची फर्स्ट स्टेज मंजूर झालेली असून संबंधित मिळकतधारकांना 6 ऑगस्ट 2014 ला लेटर ऑफ इंटेट दिले आहे. त्यामुळे सूचना व हरकती मागविण्याच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असे कळविले. 4 डिसेंबर 2015 ला खोत यांच्या कार्यालयात सुनावणी झाली.

त्यावेळी न्यायालयातील वादासंदर्भात सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. हद्द निश्‍चित नसल्याने टीडीआर देता येणार नसल्याचे लेखी म्हणणे सादर केले होते. तरीही महापालिकेची हद्द निश्‍चित नसताना व बाब न्यायप्रविष्ट असतानाही खोत यांनी हरकती विचारात न घेता न्यायालयाचा अवमान करून टीडीआर दिला. तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जमिनीच्या हद्दीबाबत कोल्हापूर महापालिका व उचगाव ग्रामपंचायत यांच्यात 2014 पासून उच्च न्यायालयात वाद प्रलंबित होता. फेब्रुवारी 2018 ला त्याचा निकाल लागला आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news,  kolhapur municipal corporation, TDR, Scam,