Mon, Jun 24, 2019 17:51होमपेज › Kolhapur › ‘पर्यायी पूल बांधकामात सव्वा कोटीचा अपहार’

‘पर्यायी पूल बांधकामात सव्वा कोटीचा अपहार’

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पुलास बांधण्यात येणार्‍या पर्यायी पुलाच्या बांधकामात सव्वा कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. या अपहाराची कॅगमार्फत चौकशी करावी अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

देसाई म्हणाले, पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्याने स्वर्गीय खा. सदाशिवराव मंडलिक यांनी नवीन पूल मंजूर करून घेतला. 2001 मध्ये हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुलाच्या संकल्पचित्रात तीनवेळा बदल करण्यात आला आहे. प्रारंभी नऊ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक 13 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्या सुधारीस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या पुलाचे नेमके संकल्पचित्र आणि अंदाजपत्रकाबाबत सांशकता निर्माण झाली आहे. मे. बंका कन्स्ट्रक्शन मुंबई या ठेकेदारास 80 टक्के कामाचे प्रत्यक्ष आठ कोटी 70 लाख 63 हजार 622 रुपये देय असताना नऊ कोटी 13 लाख 86 हजार 972 रुपये अदा केले आहेत. यामध्ये काम न करताच तब्बल सव्वा कोटी रुपये अदा केले आहेत. याबाबत याच खात्याचे उपअभियंत्यांनी दहा फेब्रुवारी 2017 रोजी पत्र देऊन जादा अदा केलेली रक्‍कम वसूल करावी, असे पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. मात्र, ही रक्‍कम वसूल झाली नसल्याने संबंधित ठेकेदार आणि  अधिकार्‍यांत संगनमत असल्याचे दिसून येते असा आरोप देसाई यांनी केला आहे. 

देसाई म्हणाले, या गैरव्यवहाराबाबत संंबंधित उपअभियंत्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संबंधित अधिकार्‍यांची नावे घालून तक्रार दिली असून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. मात्र, आतापर्यंत काहीच कारवाई झालेली नाही. पर्यायी पुलास पुरातत्त्व कायद्याचा अडसर येतो मग या ठिकाणी झालेल्या अतिक्रमीत बांधकामाबाबत महापालिकेने काय कारवाई केली. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष अधिकार वापरून पर्यायी पुलाच्या बांधकामास जनहितार्थ परवानगी द्यावी, पुलाचे संकल्पचित्र, अंदाजपत्रक, सुरक्षितता याबाबत कॅगमार्फत चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदार बंका कंस्ट्रक्शन मुंबई यांच्याकडून जादा रक्‍कम वसूल करावी. या गैरव्यवहारास जबाबादार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेस बुरहान नाईकवडी उपस्थित होते.