Wed, Jun 26, 2019 11:30होमपेज › Kolhapur › सौंदत्तीकडे मानाचे जग आजपासून रवाना होणार

सौंदत्तीकडे मानाचे जग आजपासून रवाना होणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सौंदत्ती डोंगरावर दोन डिसेंबर रोजी श्री रेणुका देवीची यात्रा होत आहे. यात्रेसाठी कोल्हापुरातील मानाचे चार जग रविवारी (दि. 26) सौंदत्तीकडे रवाना होत आहेत. 
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी दोन डिसेंबर रोजी सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुकादेवीची मुख्य यात्रा होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून ओढ्यावरील श्री रेणुका मंदिरातील मदनआई शांताबाई जाधव यांचा जग, बेलबाग परिसरातील शिवाजीराव आळवेकर यांचा जग, रविवार पेठेतील बायाक्‍काबाई चव्हाण यांचा जग आणि गंगावेश परिसरातील लक्ष्मीबाई जाधव यांचा जग आणि हे कोल्हापुरातील मानाचे चार जग मानले जात आहे. यात्रेच्या अगोदर सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवस हे जग कोल्हापुरातून सौंदत्तीकडे रवाना होत असतात.

बेलबागेतील शिवाजीराव आळवेकर यांचा मानाचा जग दुपारी बारा वाजता रवाना होत आहे. यासाठी बेलबाग येथील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर पूजा होईल, त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा जग पुढे जाईल, काही अंतर गेल्यानंतर वाहनाने हा जग सौंदत्तीकडे रवाना होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे यांनी दिली.

दरम्यान, ओढ्यावरील श्री रेणुका मंदिरातील मदनआई शांताबाई जाधव यांचा जग, रविवार पेठेतील बायाक्‍काबाई चव्हाण यांचा जग आणि गंगावेश परिसरातील लक्ष्मीबाई जाधव यांचा जग असे तीन जगही  रविवारी दुपारी चार वाजता बिंदू चौकातून रवाना होतील, या जगासमवेत कोल्हापूर शहरातील जोग जोगतीण यांच्यासह भाविक  सहभागी होणार आहे. 

दरम्यान, या यात्रेसाठी 28 नोव्हेंबरपासून कोल्हापुरातून भाविक जाणार आहे. एस.टी. महामंडळाने खोळंबाआकार गतवर्षीप्रमाणे घेण्याचे जाहीर केल्यामुळे यावर्षीही भाविकांनी एस.टी. बसला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत जवळपास 120 हून अधिक एस.टी.च्या बसेस बुक झाल्या आहेत.