Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Kolhapur › ‘पाटाकडील अ’कडून गडहिंग्लजच्या ‘नवज्योत’चा धुव्वा

‘पाटाकडील अ’कडून गडहिंग्लजच्या ‘नवज्योत’चा धुव्वा

Published On: May 10 2018 1:29AM | Last Updated: May 10 2018 12:22AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 
बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने गडहिंग्लजच्या नवज्योत संघावर तब्बल 12-0 अशा एक डझन गोल फरकाने धुव्वा उडविला. दुसर्‍या सामन्यात प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ संघाने पाटाकडील ‘ब’ संघाचा 2-0 असा पराभव करून ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. 

विजयी गोल इंद्रजित चौगुलेचे

बुधवारी दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस ‘अ’ विरुद्ध पाटाकडील ‘ब’ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. प्रॅक्टिस क्‍लबला काट्याची टक्‍कर देत मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. मात्र, उत्तरार्धात त्यांची चिवट झुंज व्यर्थ ठरवत प्रॅक्टिसने आक्रमक पवित्रा घेत आघाडी मिळविली. सामन्याच्या 46 आणि 55 व्या मिनिटाला इंद्रजित चौगुले याने सलग दोन  गोल नोंदवत आघाडी मिळविली. पीटीएमच्या अक्षय पायमल, रोहन जाधव, प्रथमेश हेरेकर, शुभम मोहिते यांनी गोल फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रॅक्टिसच्या भक्‍कम बचावामुळे अपयश आले. यामुळे सामना प्रॅक्टिसने 2-0 असा जिंकला. 

पाटाकडीलचा 12 गोल्सने विजय

सायंकाळच्या सत्रातील सामन्यात पाटाकडीलने गडहिंग्लजच्या नवज्योत संघावर 12-0 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळविला. संपूर्ण सामन्यावर पाटाकडीलचे वर्चस्व होते. पूर्वार्धात 8 तर उत्तरार्धात 4 गोल्स त्यांनी केले. ओंकार जाधव (गडहिंग्लज) व ऋषिकेश मेथे-पाटीलने प्रत्येकी चार तर अकिमने तीन आणि कोल्हापूरच्या ओमकार जाधवने एका गोलची नोंद केली. 

दुसर्‍या मिनिटाला ओंकार जाधवने, चौथ्या मिनिटाला ऋषिकेशने, 7 व्या मिनिटाला ओंकारने, 10 व्या मिनिटाला अकिमने, 15 व्या मिनिटाला ओंकारने, 19 व्या मिनिटाला अकिमने, 20 व्या व 25 व्या मिनिटाला ऋषिकेशने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 9-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 43 व्या मिनिटाला ऋषिकेशने, 48 व्या मिनिटाला ओंकारने, 57 व्या मिनिटाला अकिमने आणि 65 व्या मिनिटाला ओंकारने गोल केला. नवज्योतकडून निखील रोटे, किरण बुगाडे, विनायक साळोखे, अक्षय होडगे यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न पाटाकडीलच्या भक्‍कम बचावाने फोल ठरविले. एकाही गोलची परतफेड त्यांच्याकडून न झाल्याने सामना पाटाकडीलने 12-0 असा जिंकला.