Sun, Aug 25, 2019 00:18होमपेज › Kolhapur › ‘अब की बार, चले जाव सरकार’ : सतेज पाटील

‘अब की बार, चले जाव सरकार’ : सतेज पाटील

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप सरकारकडून जनतेची घोर निराशा झाली असून आता ‘अब की बार, चलेजाव सरकार’ असा प्रकार घडणार असल्याचे आ. सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आल्यानंतर भाजपने सर्वसामान्यांची पिळवणूकच सुरू केल्याचा आरोप पत्रकात केला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसची झालेली भरमसाट वाढ भाजप सरकारला ‘चले जाव’ करणार असल्याचे स्पष्ट करून आ. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, की स्मार्ट सिटीची घोषणा झाली; पण पुढे एकही शहर स्मार्ट झाले नाही. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये भरण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाहीच. उलट, सर्वसामान्यांचे पैसे बँकांतून कट होत आहेत. स्कील इंडियातून किती रोजगार निर्मिती झाली, याचा पत्ता नाही. नोटाबंदीतून किती काळा पैसा बाहेर आला, याचा हिशेब दिला जात नाही. स्वच्छता कर आकारला; पण देश स्वच्छ झाला का, याचे उत्तर नाही. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करूनही ती अस्वच्छच आहे.

वन रँक वन पेन्शनप्रश्‍नी सरकारने माजी सैनिकांना झुलविले आहे. आदर्श गाव योजनेतील गावांचा कायापालट झालाच नाही. सरकारने न्यायसुद्धा महाग केल्याने वकिलांनी आंदोलन सुरू केले आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नाही. शेतकर्‍यांसाठीची कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली. असे एक ना अनेक मुद्दे आहेत, की ते सरकारने प्रत्यक्षात आणलेच नाही, असा आरोप आ. पाटील यांनी पत्रकात केला आहे. सैन्य दलाच्या कार्यक्षमतेवर अविश्‍वास दाखवून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराचा अपमान केल्याने आता मतदार या सरकारला ‘अब की बार मदत करणार नाही,’ असे पत्रकात म्हटले आहे.