Wed, Feb 26, 2020 02:33होमपेज › Kolhapur › खासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील

खासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील

Published On: Dec 01 2017 10:31AM | Last Updated: Dec 01 2017 10:42AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कृषी प्रदर्शन, दहीहंडीला ‘गोकुळ’ने किती पैसे दिले? खा. धनंजय महाडिक हे जत्रेतील खेळण्यातील ट्रॅक्टर आहेत. जेवढी किल्‍ली तेवढीच चाल, याप्रमाणे ते अर्धवट माहितीवर बोलत असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली. आमचा लढा हा ‘गोकुळ’च्या उत्पादकांसाठी असून, दराच्या विषयाला फाटा देण्यासाठीच खा. महाडिक व ‘गोकुळ’चे संचालक मोर्चा काढत असल्याचा आरोप आ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

खा. महाडिक यांनी भीमा कारखान्याच्या कामगारांचा मागील दहा महिन्यांचा पगार व ऊस उत्पादकांची रक्‍कम दिलेली नाही. ती अगोदर द्यावी व नंतर आमच्या कारखान्यावर बोलावे, असा टोला आ. पाटील यांनी खा. महाडिकांना लगावला. निषेध मोर्चोचे आयोजन करून दूध उत्पादकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जर दुधाला दोन रुपये कमी मिळत असतील, तर उत्पादक या मोर्चाला जाणार नाहीत; पण मोर्चासाठी दूध उत्पादकांनी यावे यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. दूध उत्पादकाला दर देण्यासाठी संघाचा वाहतूक खर्च, स्कॉर्पिओचा खर्च, खरेदीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली. मात्र, त्यावर न बोलता वैयक्‍तिक टीकाटिप्पणी केली जात आहे. संघात 100 टँकर कार्यरत आहेत. हे टँकर कोणाचे आहेत, याची माहिती माझ्याकडे आहे. संघाने ती जाहीर न केल्यास आपण ती जाहीर करू, असा इशारा आ. पाटील यांनी दिला. यावेळी बाबासाहेब देवकर उपस्थित होते.

...आणि हे खासदार शेतकरीविरोधी खा. संभाजीराजे हे गडकिल्‍ले वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकर्‍यांचे खासदार ऊस उत्पादकांना प्रतिटन 300 रुपये जादा मिळावेत म्हणून आंदोलन करत आहेत. खा. धनंजय महाडिक मात्र दूध दर कपातीचे समर्थन करून शेतकर्‍यांच्या चुलीत पाणी ओतत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली. 

वाचा : ‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’ : खा. महाडिक