Tue, Jul 23, 2019 02:36होमपेज › Kolhapur › जेव्हा सरपंच स्वतःवरच अविश्‍वास दाखवतात...

जेव्हा सरपंच स्वतःवरच अविश्‍वास दाखवतात...

Published On: Jun 02 2018 7:37AM | Last Updated: Jun 02 2018 7:37AMकबनूर : वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. खालिदा फकीर यांच्याविरोधात शुक्रवारी 16 मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर झाला. सरपंच सौ. फकीर यांनी स्वत:च्या विरोधात दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान करीत इतिहास घडवला. 

या सभेस ग्रा.पं. सदस्य बलराम भोजणे गैरहजर राहिले. सभाध्यक्षा तहसीलदार वैशाली राजमाने यांनी 16 मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच सौ.फकीर यांचे पद आजपासून रिक्‍त झाल्याचे जाहीर केले. 

सरपंच सौ. फकीर या सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी कारभार करतात, सरकारी योजनांची अंमलबजावणी तसेच सरकारी निधीचा योग्य विनिमय करीत नाहीत आदी कारणांनी त्यांच्या विरोधात 28 मे रोजी तहसीलदारांकडे आठ सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सभेस सुरूवात झाली. राजमाने यांनी विषयाचे वाचन केले. 

यावेळी कोणत्याही सदस्याने त्यावर आक्षेप घेतला नाही किंवा म्हणणे दिले नाही. त्यानंतर राजमाने यांनी सदस्यांच्या मागणीप्रमाणे हात उंचावून मतदान घेतले. त्यामध्ये सरपंचांसह 16 जणांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

नेत्यांच्या सांगण्यानुसारच... 
नेत्यांच्या सांगण्यानुसार मी राजीनामे दिले व ते परतही घेतले. त्यांच्या सांगण्यानुसारच शुक्रवारी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. गेल्या अडीच वर्षांत जो कारभार केला तो त्यांच्या सांगण्यानुसारच, आपल्या मर्जीने मी कधीच कारभार केला नाही, असे सरपंच सौ. खालिदा फकीर यांनी सांगितले. त्यामुळे ते नेते कोण, त्यांची नावे सांगा असे विचारताच नावे सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या, असे त्यांनी सांगितले.