Sun, Jun 16, 2019 02:36होमपेज › Kolhapur › सरनाईकचे शस्त्रतस्करी कनेक्शन

सरनाईकचे शस्त्रतस्करी कनेक्शन

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जरगनगर येथील प्रतीक पोवार खुनातील संशयित प्रतीक सरनाईक याचे पुणे व्हाया वाराणसी शस्त्र तस्करीचे कनेक्शन करवीर पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पाचगाव-कंदलगाव रोडवर ओढ्यावरील पुलाजवळ दोन फुटाचा खड्डा खणून मारेकर्‍याने लपवून ठेवलेल्या दोन पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. संशयिताने वाराणसी येथून हा शस्त्रसाठा खरेदी केल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

जीवघेणा शस्त्रसाठा खरेदी करण्याचा संशयित सरनाईकचा हेतू काय, संघटित टोळ्यांना त्याने शस्त्रास्त्रांची तस्करी केली असावी का? एव्हाना त्याचा स्वत:साठी गैरवापर केला असावा का? याची त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे, असे ‘करवीर’चे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले. संशयिताने शस्त्रांची विक्री केली असावी, असाही संशय व्यक्‍त केला जात आहे.सरनाईकच्या संपर्कातील जरगनगर, विद्यापीठ परिसर, मंगळवार पेठ, प्रतिभानगर परिसरातील काही साथीदारांची नावेही चौकशीत निष्पन्‍न झाली आहेत. शस्त्र प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. चौकशीत सहभाग निष्पन्‍न झाल्यास खुनाच्या गुन्ह्यात संशयितांना सहआरोपी करण्यात येणार आहे.

जरगनगर खूनप्रकरणी सरनाईकला अटक केल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. रिव्हॉल्व्हर कोठून मिळविले? यावर प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला. सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले.तपासाधिकारी पुढे म्हणाले, चार वर्षांपूर्वी वर्चस्ववादातून प्रतीक पोवार, गौरव वडेर, रणजित गवळीसह दहा जणांनी सरनाईकला जरगनगर येथील मध्यवर्ती चौकात बेदम मारहाण केली होती. भरचौकातील घटनेमुळे अपमान झाल्याने सरनाईकने कोल्हापूर सोडले. पुण्यातील एका रबर पार्ट बनविणार्‍या कंपनीमध्ये तो कामाला लागला. पोवार, वडेरसह गवळीचा एक दिवस काटा काढायचाच, असा त्याने निर्धार केला.

हल्ल्यासाठी संधीच मिळत नव्हती

सरनाईक अधूनमधून कोल्हापूरला यायचा, अण्णा ग्रुप कट्टा चौकात थांबायचा; पण संधी मिळत नव्हती. आपण एकाकी असल्याने एकाचवेळी प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करू शकत नव्हतो, हे गृहीत धरून त्याने पिस्तूल खरेदीसाठी प्रयत्न केले; पण ते मिळाले नाही.

मित्राच्या ओळखीने शस्त्रे खरेदी केली

कंपनीतील सहकारी कामगार मूळचा वाराणसीचा होता. त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने वाराणसीजवळील खेड्यातील व्यक्‍तीचा पत्ता दिला. त्यानुसार आपण तेथे प्रत्यक्ष जाऊन त्या व्यक्‍तीचा शोध घेतला. त्याच्या ओळखीने एक रिव्हॉल्व्हर, तीन पिस्तुले व काडतूस साठा एक लाख रुपयाला खरेदी केल्याची कबुलीही सरनाईकने दिली आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

पोलिसी खाक्यानंतर संशयिताने तोंड उघडले

वाराणसी येथून खरेदी केलेल्या शस्त्रापैकी एक हत्यार इचलकरंजी पोलिसांनी हस्तगत केले. तर प्रतीक पोवारच्या खुनासाठी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याची त्याने कबुली दिली. मात्र, अन्य दोन पिस्तुलांबाबत सरनाईक तपास पथकाला वेगवेगळी माहिती पुरवित होता. अखेर बुधवारी रात्री उशिरा पोलिस खाक्यामुळे तोंड उघडले. पाचगाव-कंदलगाव रोडवर ओढ्याच्या पुलाजवळ दोन फुटांचा खड्डा खणून प्लास्टिक पिशवीत गुंडाळून शस्त्रसाठा लपविल्याची त्याने  कबुली दिली.

मध्यरात्री तीन वाजता राबविली शोधमोहीम

पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, निरीक्षक जाधव, प्रशांत माने, प्रमिला माने, प्रथमेश पाटील, किरण वावरे, सुहास पाटील, दीपक घोरपडे, सागर कांडगावे, युक्‍ती ठोंबरे, सुमित पाटील, गुरूप्रसाद झांबरे, प्रकाश काटे, चालक नंदगावकरसह पथकाने गुरुवारी मध्यरात्री तीन वाजता पोलिस बंदोबस्तात जागेची पाहणी केली. खड्डा उकरला असता, त्यातून शस्त्रसाठा हाताला लागला.

इचलकरंजीत दहशतीसाठी भरचौकात हवेत गोळीबार

सरनाईक इचलकरंजीतील शस्त्र तस्करीशी संबंधित गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात असल्याने त्याची इचलकरंजीला सतत ये-जा होती.तेथील एका तरुणाशी मतभेद निर्माण झाल्याने त्याच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी सरनाईकने तेथील भरचौकात हवेत गोळीबार केल्याचेही चौकशीत निष्पन्‍न झाले आहे, असेही दिलीप जाधव यांनी सांगितले.

टोळीवर ‘मोक्‍का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

पोवार खून प्रकरणात सरनाईकला अनेक साथीदारांनी मदत केल्याचे उघड झाले आहे. काहींनी पैसे पुरविले आहेत, तर काहींनी कपडे बदलण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सहा ते सात जणांची नावे पुढे आली आहेत. सर्वांची सखोल चौकशी करून दोषी ठरणार्‍यांना सहआरोपी करून त्यांना अटक केली जाईल, मोक्‍काअंतर्गत कारवाईचा पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल, असेही जाधव यांनी सांगितले.

विशेष पदकासाठी शिफारस करणार : संजय मोहिते

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव व पथकाच्या कामगिरीवर समाधान व्यक्‍त करून विशेष पदकासाठी पोलिस महासंचालकांकडे शिफारस करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. क्राईम आढावा बैठकीत तपासाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचाही गौरव करण्यात येईल, असेही ते म्हणाले.