होमपेज › Kolhapur › संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या रूपात

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या रूपात

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 28 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रबोधनाला बक्षिसाची जोड दिली तरच लोक स्वीकारतात हा धडा मिळाल्याने राज्य सरकारने दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान रोख बक्षिसासह नव्या स्वरूपात आणले आहे. ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढवणारे हे अभियान 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू होत असून 2 ऑक्टोबरला पुरस्कारांचे वितरण होईल, असे नियोजन केले गेले आहे. 

2008 मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हाती घेतले. गावांना स्वच्छतेचा मार्ग दाखवणार्‍या या पहिल्याच योजनेत स्पर्धा ठेवल्याने त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण कालांतराने स्वच्छतेत सातत्य न राहिल्याने गावे पुन्हा बकाल दिसू लागल्याने शासनाने आपल्या धोरणात बदल करण्याचे ठरवले. 

आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या नावाने नव्या रूपात नव्या ढंगात हे अभियान पुन्हा एकदा सक्रियपणे राबवण्यात येणार आहे. या अभियानात बक्षिसांची अक्षरशः बरसात करण्यात आली आहे. आतापर्यंत तालुका, जिल्हा व राज्य पातळी अशी तीन स्तरावर असणारी बक्षीस योजना आता गावांतर्गत प्रभागामध्येही होणार आहे. जि.प. मतदारसंघातील गाव, जिल्ह्यातील गाव, विभागातील जिल्हा, राज्यातील जिल्हा अशा पाच पातळीवर स्पर्धा  होऊन पुरस्कार देण्याचे धोरण निश्‍चित केले गेले आहे.

स्वच्छ जिल्हा परिषदेला मिळणार 1 कोटी

या स्वच्छता अभियानांतर्गतच राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरस्कार दिले जाणार आहेत.  जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1 कोटीचे, द्वितीय 75 लाख तर तृतीय क्रमांकाला 50 लाख रुपये मिळणार आहेत. स्वच्छ पंचायतीसाठी प्रथम क्रमांकाला 50 लाख, द्वितीय 30 लाख तर तृतीय 20 लाखाचे बक्षीस आहे. ही सर्व बक्षिसे राज्यस्तरीय असणार आहेत.