Mon, Jun 24, 2019 17:10होमपेज › Kolhapur › भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ धडक मोर्चा

भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ धडक मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर  : प्रतिनिधी

भीमा-कोरेगावप्रकरणी संभाजीराव भिडे गुरुजींवर खोटे आरोप केले असून, त्यांच्यासह मिलिंद एकबोटे, धनाजी देसाई यांच्यावरील गुन्हे सन्मानाने मागे घ्या, या मागणीसह भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

भगवे ध्वज, भगव्या टोप्या परिधान केलेले शेकडो कार्यकर्ते जथ्थ्याने सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच बिंदू चौकात जमा झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्येयमंत्र म्हणून बिंदू चौकातून मोर्चास सुरुवात झाली. घोषणांचा गजर आणि हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, असेम्ब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. पश्‍चिमेकडील दरवाजाजवळ पोलिसांनी मोर्चा रोखला. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. 

‘अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्‍नेश मेवानी, बी. जी. कोळसे-पाटील, उमर खलिद यांना अटक करा’, ‘जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदू धर्म...’ अशा विविध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. व्यापक शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा कोल्हापूर बंद करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अशा आहेत मागण्या

दगड फेकल्याचा भिडे गुरुजींवर खोटा आरोप करणार्‍या महिलेस अटक करून तिची नार्को टेस्ट करावी, जातीयवाद निर्माण होईल अशी वक्‍तव्ये करणार्‍या भारिप, कम्युनिस्ट आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, भीमा-कोरेगावप्रकरणी झालेल्या दंगलीत हत्या झालेला राहुल फटांगळे या युवकाच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत देऊन, शासनाने त्यांच्या वारसाला शासकीय नोकरी द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

‘हिंदू समाजात फूट पाडणार्‍यांना मातीत गाडू’, ‘भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे, धनाजी देसाई यांच्यावरील खोटे गुन्हे सन्मानाने मागे घ्या’, ‘भिडे गुरुजी के सन्मान में, सब हिंदू मैदान में’, ‘शाहू नगरीत संविधानाचा मान राखू, जातीपाती मुक्‍त करू’, ‘धर्माचे राजकारण करण्यापेक्षा समाजहिताचे राजकारण करा’, ‘नक्षलवादी देशभक्‍त मग देशाचे रक्षण करणारे पोलिस कोण?’, या आशयाचे फलक मोर्चातील आंदोलकांच्या हाती होते.   बिंदू चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजळ प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. बंडा साळुंखे, महेश उरसाल, संजय पवार, मुरलीधर जाधव, परिवहन सभापती राहुल चव्हाण, रवी चौगुले, राजू यादव, मधुकर नाझरे, मनोहर सोरप, रघुनाथ टिपुगडे, शशी बिडकर, शिवानंद स्वामी, सुनील पाटील, किशोर घाटगे, दुर्गेश लिंग्रस,  नगरसेवक ईश्‍वर परमार, किरण नकाते, रणजित आयरेकर, जयवंत हारुगले, दीपक गौड, रमेश खाडे, सुमित सूर्यवंशी, मंदार तपकिरे, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, सुवर्णा पवार, सरोज फडके, नम्रता पाटील यांच्यासह आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Sanman Morcha, supporting, Sambhaji Bhide


  •