Tue, Apr 23, 2019 23:41होमपेज › Kolhapur › सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू, वारणानगर चोरी तपासाचा संजयकुमारांनी घेतला आढावा

सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू, वारणानगर चोरी तपासाचा संजयकुमारांनी घेतला आढावा

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषणचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण आणि वारणानगर चोरी प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. दोन्हीही घटनांची सखोल चौकशी करून तपासात तांत्रिक उणिवा राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सीआयडीच्या स्थानिक तपास अधिकार्‍यांना दिल्या. 

अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांच्या दौर्‍याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. सीआयडीच्या कोल्हापूर व सांगली येथील अधिकार्‍यांसमवेत त्यांची चार तासांहून अधिक काळ बैठक झाली. 

सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित व निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने घटनेदिवशी शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संजयकुमार यांनी तपशिलवार माहिती घेतली. युवराज कामटेसह अन्य संशयितांवर न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपपत्राचाही त्यांनी आढावा घेतला. पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याबाबतही त्यांनी तपास अधिकार्‍यांना सूचना केल्या. 

वारणानगर येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणाच्या तपासाबाबतही संजयकुमार यांनी माहिती घेतली. चोरी प्रकरणातील काही आरोपींना जामीन झाला आहे. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव तंत्राचा अवलंब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या जामीन अर्जाला आव्हान देण्यासाठी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याच्या सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना सूचना केल्या. अनिकेत कोथळे मृत्यू व वारणानगर चोरीप्रकरणी तपासात तसूभरही तांत्रिक उणिवा राहू नयेत.

आरोपींविरोधात भक्‍कम पुरावे हजर करण्यासाठी तपास यंत्रणेतील सर्व घटकांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना संजयकुमार म्हणाले, अनिकेत कोथळे मृत्यू आणि वारणानगर येथील चोरीच्या घटनेचा अधिकार्‍यांकडून आढावा घेतला आहे. तपास प्रक्रियेत कोणत्याही उणिवा राहू नयेत, याबाबत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.