Thu, Aug 22, 2019 12:56होमपेज › Kolhapur › राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

राज्यातील ९ महिला कारागृहांत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 1:09AMकोल्हापूर ः पूनम देशमुख

कारागृहात विविध कारणांनी शिक्षा भोगणार्‍या महिलांच्या आरोग्याची काळजी महिला आयोगाने घेतली आहे. या कैद्यांकरिता सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन तसेच वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन पुरवण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे. त्यामुळे त्या विशिष्ट दिवसांतील कैद्यांची होणारी कुचंबणा दूर होणार आहे. कोल्हापूरसह राज्यातील 9 कारागृहांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्य महिला आयोगाकडून राज्यातील विविध महिला कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे. कारागृहात असणार्‍या महिलांना सुविधा मिळाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. 

राज्य महिला आयोगाकडून भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूसंदर्भात तसेच राज्यातील कारागृहात असणार्‍या महिला कैद्यांना पुरवण्यात येणार्‍या सोयीसुविधा, आहार, आरोग्य व सुरक्षितता आणि अनुषंगिक बाबींची चौकशी करण्यासाठी तसेच त्यासंबंधीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महिला कैद्यांना सुविधा मिळावी यासाठी आयोगाकडून राज्यातील 9 महिला कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन आणि वापर झालेले पॅड नष्ट करण्यासाठी बर्निंग मशीन देण्यात येणार आहे .

वेंडिग मशीन कारागृहात देताना सोबत पन्नास नॅपकीन आयोगामार्फत देण्यात येणार आहेत. त्यानंतर वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशिनमध्ये सॅनिटरी पॅड भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटराशी संपर्क साधणे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित जेल प्रशासनाचा असणार आहे. 

सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्यात येणारी कारागृहे

कारागृह                  कैद्यांची संख्या     
कोल्हापूर                        65 
 येरवडा                          233
 ठाणे                              104
 मुंबई (भायखळा)             309
 कल्याण                         110
 औरंगाबद                         67
 नागपूर                            60
 अमरावती                        39
 चंद्रपूर                             36

महिला कैद्यांच्या हक्कांसाठी आयोग सजग आहे. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी कारागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - विजया रहाटकर राज्य महिला आयोग अध्यक्षा