Wed, Aug 21, 2019 20:02होमपेज › Kolhapur › सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशिन काळाची गरज

सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशिन काळाची गरज

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:54AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

मुलींच्या शिक्षणाबरोबर तिच्या आरोग्याची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे. मुलींसाठी सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशिन उपयुक्‍त असून ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा यांनी केले. दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग फाऊंडेशन व रोटरी क्‍लब ऑफ गार्गीज यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सॅनिटरी पॅड डिस्पोझल मशिन प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कळंबा गर्ल्स हायस्कूल, कळंबा अणि सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, राजेंद्रनगर या दोन शाळांना गुरुवारी मशिन प्रदान करण्यात आले. यावेळी दै. ‘पुढारी’च्या संचालिका डॉ. सौ. स्मितादेवी योगेश जाधव, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त सौ. प्रतिमा पाटील, रोटरी क्‍लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा सुजाता लोहिया, सचिव कविता घाटगे, नीता नरके, विना सिन्हा, प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव, अजिंक्य जाधव व ओअ‍ॅसिसचे शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन विद्या मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात सुरेखा शहा यांच्या हस्ते फित कापून मशिनचे उद्घाटन झाले. शहा म्हणाल्या, महिला सबलीकरणासाठी दै. ‘पुढारी‘ व रोटरी गार्गीजचे हे पाऊल निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या मशिनमुळे शाळांमध्ये स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचे संवर्धनही होणार आहे. यावेळी नगरसेविका रूपाराणी निकम, मुख्याध्यापक संभाजी कुंभार, संतोष मोरमारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.   

कळंबा गर्ल्स हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव यांच्या हस्ते मशिन प्रदान करण्यात आले. जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थिनींनी या मशिनची सविस्तर माहिती घेऊन त्याचा वापर करावा. या मशिनची माहिती पालकांनाही द्यावी. या मशिनबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रतिमा पाटील म्हणाल्या, शिक्षणाबरोबरच मुलींसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात यावे. आजच्या युवा पिढीने शालेय जीवनापासूनच सामाजिक भान जपावे. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैशाली मर्दाने, भारती सावंत, सुदेष्णा आडसूळ, मुख्याध्यापिका एस. ए. जाधव, आर. आर. चौगुले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट ही समस्या बनली होती. शाळेमध्ये हे मशिन उपलब्ध झाल्यामुळे परिसर स्वच्छ राहणार आहे. मुलींनी निसंकोचपणे हे मशिन हाताळावे. दै. ‘पुढारी’ने हा उपक्रम राबविल्याबद्दल आभारी आहोत.
    - लता सावंत, अध्यक्षा, कळंबा गर्ल्स हायस्कूल

दै. ‘पुढारी’ नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिनची गरज ओळखून ‘पुढारी’ व रोटरी गार्गीज यांनी शाळांमध्ये हे प्रदान केले. या उपक्रमास शुभेच्छा. 
- रूपाराणी निकम, नगरसेविका, राजेंद्रनगर