Mon, Jun 17, 2019 03:25होमपेज › Kolhapur › संगीतसम्राट म्युझिक मॅरेथॉन कोल्हापुरात

संगीतसम्राट म्युझिक मॅरेथॉन कोल्हापुरात

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठी संगीत क्षेत्रातील अभूतपूर्व टॅलेंट  शो ‘संगीतसम्राट म्युझिक मॅरेथॉन’ कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे. झी युवा प्रायोजित आणि दै. पुढारी कस्तुरी क्‍लब यांच्या वतीने ही संगीत मैफल केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी (दि. 9) रात्री 9 वाजता रंगणार आहे. कार्यक्रमाचे मीडिया प्रायोजक दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, तसेच जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना, प्रियंका बर्वे, अभिजित कोसंबी यांच्या गायनाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. 

सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम अर्थात संगीत. श्रवणीय स्वरांना मधूर आवाजाचा स्पर्श होतो आणि तालाची जोड मिळेल तेव्हा ऐकणार्‍यांचे पाय आपसुकच ठेका धरतात. ते स्वर कानात साठवण्याचा ध्यास लागतो. संगीताची ही किमया आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. आयुष्यातील प्रत्येक भावना संगीताच्या सोबतीने अनुभवतो... जगतो. याचीच दखल घेत आपले संगीत आपल्या लोकांसमोर आणण्यासाठी झी युवा या वाहिनीने पुढाकार घेत ‘संगीतसम्राट’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. 

‘संगीतसम्राट’ या कार्यक्रमाचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन बुधवार, दि. 13 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परीक्षक म्हणून आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील संगीत आणि गायकी क्षेत्रातील कलाकारांना एक वेगळा दर्जा मिळाला आहे. गाण्यांवर आधारित रिअ‍ॅलिटी शोच्या गर्दीत ‘संगीतसम्राट’ या आगळ्या-वेगळ्या म्युझिक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाने स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. या माध्यमातून संगीतमय माणसांचा शोध आणि माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाचे पासेस टोमॅटो एफ.एम. कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध होतील. कस्तुरी क्‍लब सभासदांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेश मर्यादित असून, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य असेल. अधिक माहितीसाठी संपर्क 8805024242, 9762166760.