Wed, Nov 21, 2018 01:04होमपेज › Kolhapur › ‘संध्यामठ’ने ‘बालगोपाल’ला विजयासाठी झुंजविले

‘संध्यामठ’ने ‘बालगोपाल’ला विजयासाठी झुंजविले

Published On: Apr 24 2018 1:01AM | Last Updated: Apr 23 2018 11:51PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

बलाढ्य बालगोपाल संघाला चुरशीची झुंज देत संध्यामठ तरुण मंडळाने त्यांना विजयासाठी झुंजविले. अखेर पूर्वार्धात सचिन गायकवाडने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर बालगोपालने त्यांचा पराभव करून ‘महापौर चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सोमवारी दुसरा उपांत्य सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात झाला. सामन्याची सुरुवात काहीशा धिम्या गतीनेच झाली. बालगोपालकडून आघाडीसाठी चढाया सुरू झाल्या. 31 व्या मिनिटाला सुरज जाधवच्या पासवर सचिन गायकवाडने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. यानंतर दोन्ही संघांकडून दिशाहिन फटके आणि समन्वयाचा अभाव असणारा कंटाळवाणा खेळ झाला. यामुळे मध्यंतरापर्यंतचा सामन्यात बालगोपालची 1-0 आघाडी राहिली. 

उत्तरार्धात बालगोपालच्या रोहित कुरणे, बबलू नाईक, इम्राण पठाण, सुरज जाधव, सचिन गायकवाड, श्रीधर परब यांनी आघाडी भक्कम करण्यासाठी लागोपाठ जोरदार प्रयत्न केले. मात्र, समन्वय आणि फिनिशिंगअभावी त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. संध्यामठकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरूच होते. मात्र, बालगोपालच्या भक्कम बचावामुळे त्यांना वारंवार अपयश आले. त्यांच्या अक्षय पाटील, अभिजित सुतार, सर्वेश शिंदे, स्वराज सरनाईक, शाहू भोईटे यांनी गोलसाठी जोरदार चढाया केल्या. मात्र, त्या फोल ठरल्या. यामुळे बालगोपालने हा सामना एकमेव गोलने जिंकला. 

आजचा सामना : पाटाकडील तालीम मंडळ वि. खंडोबा तालीम मंडळ, सायंकाळी 4 वाजता.

Tags : Kolhapur, Sandhyamath, vs, Bal Gopal,  mayor trophy