Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’वर पोसलेल्यांनी सहकार शिकवू नये

‘गोकुळ’वर पोसलेल्यांनी सहकार शिकवू नये

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत भगव्याच्या आडून सभासदांची मुस्कटदाबी करणार्‍या व ‘गोकुळ’च्या मलईवर पोसलेल्या पांढर्‍या बोक्यांनी सहकारी संस्था कशा चालवाव्यात हे आम्हाला शिकवू नये, असा पलटवार शेकापचे माजी आमदार संपतराव पवार -पाटील यांनी माजी आ. पी.एन.पाटील यांच्यावर केला. 

‘गोकुळ’कडून 7 डिसेंबरला  निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पी. एन.पाटील यांनी संपतराव पवार-पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती.  शासनाचे अनुदान लाटण्यासाठीच काहीजण सहकारी संस्था काढतात. पण अशा संस्था फार काळ टिकत नसल्याचे त्यांनी  म्हटले होते. पाटील यांनी केलेल्या या टीकेला आज पवार-पाटील यांनी  उत्तर दिले. 

‘गोकुळ’ आज राज्यात, देशात व आशिया खंडात प्रगतीवर आहे. सभासदांच्या विश्‍वास असल्यानेच तो प्रगतीवर असून पुढेही राहणार आहे. त्यासाठी महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी सांगण्याची गरज नाही. एवढा अग्रगण्य संघ असताना सर्वसाधारण सभा का गुंडाळण्यात आली? असा सवाल त्यांनी केला. सभा गुंडाळत असताना पी. एन. पाटील गप्प का बसले? खरे तर ‘गोकुळ’मधील हुकुमशाही कारभाराबाबत त्यांनी बोलणे आवश्यक होते. संघाचा कारभार पारदर्शी आहे तर ते गप्प का बसले?

या अनागोंदी कारभारात त्यांचाही सहभाग आहे की काय? असा सवाल दूध उत्पादकांना पडला असल्याचे पवार-पाटील यांनी सांगितले.  पी. एन. पाटील यांनी भागात असलेल्या त्यांच्या सहकारी संस्था व आमच्या सहकारी संस्थांचे मूल्यमापन करावे. आमच्या संस्था या सरसच आहेत, असा दावा त्यांनी केला.

1979 मध्ये लोकांकडून भागभांडवल गोळा करून सहकारी सूतगिरणीची नोंदणी केली होती. राजकीय विरोधाने हा प्रकल्प झाला नाही. 1988 मध्ये याच भागभांडवलावर रसायन व खत उद्योग काढण्याचा निर्णय झाला. यावेळीही सत्ताधार्‍यांनी विरोधच केला. शासकीय अनुदान देण्यास आठ वर्षे लावली. आज हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा उजवा हात समजणार्‍या पी. एन. पाटील यांनाही सूतगिरणी काढण्यास 18 वर्षे लागली हे ही त्यांनी विसरू नये, असा टोला पवार पाटील यांनी लावला.