Mon, May 27, 2019 09:55होमपेज › Kolhapur › समीर देसाईने मारले चांदेकरवाडीचे मैदान

समीर देसाईने मारले चांदेकरवाडीचे मैदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कसबा वाळवे : वार्ताहर

चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथे कुस्ती शौकिनांच्या साक्षीने भरवलेल्या लाल मातीतील दंगलीमध्ये पै. समीर देसाई यांने विद्युत चपळाईने अवघ्या पाच मिनिटांत महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शिवाजी पाटील याला घिस्सा डावावर आस्मान दाखवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  विजयी मल्लासाठी असणार्‍या रत्न-प्रकाश चषकावर त्याने आपले नाव कोरले. आमदार प्रकाश आबिटकर, मैदानाचे संयोजक पै. प्रकाश खोत, कुलदीप खोत यांच्या हस्ते हा मानाचा चषक  त्याला प्रदान करण्यात आला.  

क्रमांक दोनची कुस्ती मोतीबागचा पै. बाबासो रानगे विरुद्ध गंगावेश तालमीचा मल्ल पै. नीलेश पाटील यांच्याकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या; पण सुमारे 20 मिनिटे लोकांना त्यांची केवळ रेडे झुंजच पहावी लागली. शेवटी  बाबासो रानगे याने नीलेश पाटील यांच्यावर गुणांनी मात करत विजय मिळवला. तीन नंबरची कुस्ती मोतीबागचा पै. यश माने विरुद्ध निढोरीचा पै. सतीश आडसुळे यांच्यात चांगलीच रंगली. दोघेही  आक्रमकपणे डावपेच करत होते. सतीश अडसुळेने दुहेरी पट काढत पै. यश मानेला चितपट केले. 

एक ते तीन क्रमांकाच्या कुस्ती बरोबरच काही मल्लांनी तीन ते चार मिनिटांत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखवले. यामध्ये  बानगेच्या शशिकांत बोंगार्डे याने घिस्सा डावावर विजय मिळवला. ठिकपुर्लीच्या पै. ओंकार चौगलेने काही मिनिटांत फुटी टाकून पै. सुभाष पाटीलला चारीमुंड्या चितपट केले. तर राशिवडेचा पै. नितिनंद कांबळे याने घुटना डावावर अनिकेत पाटीलला आस्मान दाखवले. तसेच कसबा वाळवेचा अंध मल्ल कुलदीप पाटील प्रत्येक मैदाना बरोबरच  या मैदानातही अजिंक्य राहिला. त्याने डोळ्यांना काही दिसत नसतानाही अवघ्या काही सेकंदात आमशीच्या पै. संकेत पाटीलला लोळवले. तर चांदेकरवाडीमधील एकाच कुस्ती शौकीन घरातील प्रशांत खोत व अक्षय खोत या दोन युवा मल्लांनी अवघ्या काही  सेकंदात आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानांना चितपट करून  विजयावर आपली मोहर उमठवली.

मैदानातील चटकदार विजय मिळवणारे मल्ल पुढील प्रमाणे ः पै. मोहन रंडे (मंडलिक आखाडा), पै. राकेश भोकरे, पै. समर्थ म्हाकवे, प्रथमेश माळी (सर्व पट्टण कोडोली), पै. साईराज चौगले व संभाजी धुंदरे( दोघेही राशिवडे), पै. गणेश कदम (दोनवडे), पै. आकाश कापडे (आनूर), पै. नीलेश हिरुगडे, ओंकार ताटे, पै. रोहित पाटील, पै. वैभव जाधव  (सर्व बानगे), पै. ओंकार काशीद, शुभम पाटील, रोहित सुतार, श्रेयस गुरव (सर्व बेलवळे), पै. गणेश खोत, पै. विवेक खोत, पै. साहिल सावंत, पै. रोहित नलवडे, पै. रोहित खोत (सर्व चांदेकरवाडी), पै. सिद्धनाथ नंदिवाले (कुरणी), पै. सुदर्शन पाटील (हदनाळ), पै. अमर पाटील, पै. दिगंबर पाटील ( सर्व कुंभी कासारी), पै. सूरज भुईंगडे, रोहित पवते, श्रेयस पाटील (सर्व परीते), आदीं बरोबरच 100 हून अधिक कुस्त्या झाल्या.मैदानाचे आखाडा पूजन राधानगरी पोलिस निरीक्षक ए. डी. इंदलकर, पै. भिकाजी महादेव खोत, संयोजक वस्ताद प्रकाश खोत यांचे हस्ते झाले. 

महान भारत केसरी दादू चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर,  बिद्री संचालक बाबासो हिंदुराव पाटील,  उमेशराव भोईटे, भाजप नेते भरत पाटील,   मारुतीराव फराक्टे आदी उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती मध्ये  ‘तुझ्यात जीव रंगला’  फेम भाल्या ऊर्फ अतुल पाटील हे अभिनेते उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यास तरुणांनी गर्दी केली होती. संदीप खोत यांनी आभार मानले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, samir desai,  kushti, wins, Chandekarwadi, wrestling  Game


  •