Sat, Jul 04, 2020 20:39होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सलमानने दत्तक घेतले खिद्रापूर; पडलेली घरे बांधून देणार

कोल्हापूर : सलमानने दत्तक घेतले खिद्रापूर; पडलेली घरे बांधून देणार

Last Updated: Feb 27 2020 8:46AM
मुंबई/जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावर्षी आलेल्या भीषण पुरात उद्ध्वस्त झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव प्रसिद्ध चित्रपट कलावंत सलमान खान याच्या कंपनीने दत्तक घेतले आहे. सलमान खान फिल्मस् आणि गुरुग्राम येथील एलान फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत खिद्रापूरमध्ये वाहून गेलेली तसेच पडझड झालेली घरे पुन्हा पक्क्या स्वरूपात बांधून दिली जाणार आहेत. दरम्यान, हे वृत्त समजताच गावकर्‍यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. 

घरबांधणीतील तज्ज्ञ, राज्य सरकार, स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच अन्य देणगीदारांच्या सहकार्याने पूरग्रस्त खिद्रापूरमध्ये घरबांधणी करून संपूर्ण गावाचा व्यापक विकास केला जाणार आहे. ‘एक जबाबदार स्वयंसेवी संस्था म्हणून ग्रामीण भारतात सकारात्मक बदल घडवून आणण्यास वचनबद्ध आहोत. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग हा भारताचा पाया आहे त्यामुळे हा प्रकल्प अल्पभूधारकांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी हा छोटासा प्रयत्न आहे.’ अशी प्रतिक्रिया एलान फाऊंडेशनचे संचालक रवीश कपूर यांनी दिली.

‘2019 च्या पुरामध्ये ज्यांनी कुटुंबे गमावली, अनेकांचे वैयक्‍तिक नुकसान झाले, तर अनेकांना घरदारदेखील गमवावे लागले. या लोकांसोबत माझ्या संवेदना असून या गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे’, अशी प्रतिक्रिया सलमान खान याने दिली आहे.

या प्रकल्पासाठी एलान फाऊंडेशनने कोल्हापूर जिल्हा परिषद आणि राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार केला असून त्यानुसार घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच आवश्यक ते मनुष्यबळ एलान फाऊंडेशनकडून दिले जाणार आहे. 

या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच प्रशासकीय सहकार्यासाठी राज्य सरकारने सात सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तांत्रिक सदस्य, जिल्हा दंडाधिकारी, महसूल विभागाचे सदस्य, ग्रामसेवक त्याचप्रमाणे एलान फाऊंडेशनचे काही सदस्य यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती बांधकामाचा आढावा घेईल.

महापुरात खिद्रापूर 15 दिवस पाण्यात

ऑगस्टमध्ये आलेल्या महापूरात ऐतिहासिक कोपेश्‍वर मंदिराने प्रसिध्द असलेले खिद्रापूर हे गाव 15 दिवस चहूबाजूंनी पाण्याने वेढले होते. महापुरात अनेक घरे भुईसपाट झाली. ऐतिहासिक कोपेश्‍वर मंदिरालाही धोका पोहचला आहे. मंदिरात सात फुट तर गावात तब्बल 12 फुट पाणी पातळी होती.

आसिफ कागवाडेचे गावकर्‍यांकडून कौतूक

बिईंग ह्युमन व एलान फौंडेशनच्या चारजणांच्या पथकाने सातत्याने पुरग्रस्त कुटूंबांचा सर्व्हे केला. त्यांना गावातील तरूण आसिफ टाटाजी कागवाडे याने सहकार्य केले. कागदपत्रासह सर्व माहिती पुरविली. सलमान यांनी गाव दत्तक घेतल्याचे समजताच ग्रामस्थांनी फटाके फोडत आनंद साजरा केला.