Sat, Mar 23, 2019 01:58होमपेज › Kolhapur › सहा महिन्यांत दुसरा संप; दीड कोटीचा फटका

सहा महिन्यांत दुसरा संप; दीड कोटीचा फटका

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 1:03AMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

वेतनवाढीसाठी एसटी कर्मचार्‍यांना सहा महिन्यांत दुसर्‍यांदा संपावर जावे लागले, यावरून सरकारमधील काही चुकाही समोर येत आहेत. याशिवाय एसटीच्या भवितव्याबाबतही अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. संपामुळे दीड कोटीचा फटका बसला आहे.

वेतनवाढ मिळावी म्हणून आणि त्यानंतर घोळ मिटावा, यासाठी एस.टी. कर्मचार्‍यांना संप करण्याची वेळ आली. मागच्यावेळी संघटनांनी एकत्र येऊन संपाची हाक दिली होती, आता मात्र कर्मचारीच संपावर गेले होते. कर्मचार्‍यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला. आता कर्मचार्‍यांना 4 चार 849 कोटी रुपये मिळणार आहेत.

एसटी बस ही सर्वसामान्य जनतेची आहे. ती आता खेडोपाडी पोहोचली आहे. त्यामुळे जनतेला एसटीची सवय झाली आहे. पण, एसटीचा गाडा चालवणे हेच आता मोठे दुखणे होऊन बसले आहे. एकाच संस्थेतील कर्मचारी तेही लाखोंच्या संख्येने सहा महिन्यांत दुसर्‍यांदा संपावर जातात, हीच बाब सर्वसामान्यांना विचार करावयास लावणारी आहे.

आता एसटी कर्मचार्‍यांचा संप मागे घेतला. पण, कर्मचार्‍यांचे मूळ दुखण्याचे काय, असाही प्रश्‍न आहे. एसटी गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. या तोट्यातून एसटीबाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज असता खासगी कंपनीकडून भाड्याने बसेस घेऊन शिवशाही बसेस सुरू केल्या.राज्यात दीड हजार बसेस सुरू आहेत. या बसेससाठी 30 प्रवासी मिळालेच पाहिजेत, अशी अट आहेत; पण बर्‍याचवेळ्या शिवशाही बसेस तोट्यात चालतात. त्यामुळे एसटीच्या कर्मचार्‍यांनी महसूल कमवायाचा आणि खासगी कंपनीला त्यातील मोठा वाटा द्यावयाचा, असा प्रकार सध्या सुरू आहे.

त्यातच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ज्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ देण्याबरोबर घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ कमी केली आहे, तसेच ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी पाच वर्षे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करा, असे काढलेले आदेश आहेत, हा प्रकार कर्मचार्‍यांच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचा ठरला. त्यामुळे कर्मचारी संपावर गेले. एसटीने पाच वर्षांपूर्वी लांब पल्ल्याच्या मार्गावर कमकुवत गाड्या देणे, त्या चुकीच्या वेळा सोडणे, या गाड्यांना अनेक थांबे दिले. यामध्ये प्रवाशांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे प्रवासी संख्या घटत आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे.

या संपामुळे राज्यात एसटीचे 30 कोटींचे नुकसान झाले, तर कोल्हापूर विभागाचे 1 कोटी 70 लाखांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातील 1060 पैकी 100 बसेस मार्गावर होत्या. उर्वरित सर्व गाड्या चालकांनी डेपोत जमा केल्या होत्या.  दोन दिवस झालेल्या संपाचा फटका चाकरमान्यांना जास्त बसला. कारण उन्हाळ्याची सुटी संपवून नोकरीच्या ठिकाणी जात असताना अनेकांना मध्येच अडकून पडावे लागले. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी संपाचा फायदा उठवत दुप्पट दर आकारून प्रवासी वाहतूक केली.

250 मार्गांवर शिवशाही बसेस सुरू 

शिवशाही बसेस या खासगी कंपनीच्या आहेत. या बसेस जेव्हा महामंडळाच्या सेवेत आल्या, त्यावेळी महामंडळाने या बसेससाठी 56 मार्गांवरील एसटीच्या बसेस बंद करून त्या मार्गावर शिवशाही बस सुरु केल्या. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिवशाही बसेस सुरू केल्या. राज्यातील 250 मार्गांवर शिवशाही बस सुरू आहेत. कर्मचार्‍यांना गणवेश देणे, तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रायमॅक्स मशिन खराब असणे अशा अनेक बाबी चुकीच्या घडल्या आहेत, याला प्रशासन जबाबदार आहे.

तुट भरून काढण्याची कर्मचार्‍यांवर जबाबदारी  

मागील संपावेळी वेतनवाढ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एसटी प्रशासनाला दिले होते. त्यासाठी वेळेचे बंधन घातले होते. त्यामुळे ऑक्टोबर 2017 चा संप कर्मचारी संघटनेला मागे घ्यावा लागला. ही वेळ पाळण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 1 जून रोजी कर्मचार्‍यांना वेतनवाढ जाहीर केली. पण, वेतनवाढीचा निर्णय एवढा घातकी होता की त्याचे परिपत्रक कर्मचार्‍यांच्या हातात पडताच कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला. पण, संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत बुडालेला महसूल भरून काढण्याची जबाबदारी आता कर्मचार्‍यांवर आली आहे.