Tue, Mar 19, 2019 10:02होमपेज › Kolhapur › गडहिंग्लज : कोल्हापूरवरून एसटी आल्याने कर्मचार्‍यांमध्ये बाचाबाची

गडहिंग्लज : कोल्हापूरवरून एसटी आल्याने कर्मचार्‍यांमध्ये बाचाबाची

Published On: Jun 09 2018 4:38PM | Last Updated: Jun 09 2018 4:37PMगडहिंग्लज : प्रतिनिधी 

महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ व वेतन करारातील अटी मान्य नसल्याबद्दल शुक्रवार (८ जून) मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने शुक्रवारी दिवसभर गडहिंग्लज स्थानकावर पूर्णतः शुकशुकाट दिसून आला होता. आज मात्र सकाळी कोल्हापूर येथील संभाजीनगर आगारातून एक एसटी गडहिंग्लजमध्ये प्रवाशांना घेवून आल्याचे स्थानिक कर्मचार्‍यांना कळताच त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. 

कोणाच्या सांगण्यावरून ही गाडी आणली, साहेब पैसे देणार आहेत का असा भडीमार करून कोल्हापूरहून आलेल्या वाहक व चालकाला स्थानिकांनी दमदाटी केली. यामध्ये प्रवाशांनी भाग घेतल्याने गडहिंग्लज बसस्थानकावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. प्रवाशांचे मात्र दुसर्‍या दिवशीही प्रचंड हाल झाले. 

गडहिंग्लज बसस्थाकावर दररोज ४०० हून अधिक बसफेर्‍या होतात यामधून  हजारावर प्रवाशांची ये-जा असते. यामुळे दररोज प्रचंड गजबजलेले हे स्थानक एसटीच्या संपामुळे पूर्णतः सुनेसुने झाले होते. यामुळे आगाराचे नुकसानही वाढले असून आज दुसर्‍या दिवशी खासगी वाहनधारकांनी मात्र चांगलेच पैसे कमावले आहेत. काही ठिकाणी तर तब्बल दुप्पट पैसे घेवूनही वाहनधारक जाण्यासाठी मागेपुढे करत होते. एकूणच एसटीच्या संपामुळे दुसर्‍या दिवशीही प्रवाशांना प्रचंड त्रास झाला आहे.