Tue, Apr 23, 2019 23:40होमपेज › Kolhapur › एसटी स्टँडवर हवेत गोळीबार

एसटी स्टँडवर हवेत गोळीबार

Published On: Jun 08 2018 1:38AM | Last Updated: Jun 08 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लघुशंकेसाठी उभा राहिल्याच्या कारणावरून येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील पादचारी उड्डाण पुलाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर हवेत गोळीबार करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. 

पेट्रोल पंपाजवळ एक प्रवासी लघुशंकेसाठी उभा राहिला होता. यावेळी त्याला सुनील नलवडे याने हटविण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वाद वाढत गेल्याने लोकांची गर्दी जमली. गर्दी पाहून पेट्रोल पंपावर असणारा मुकुंद रामचंद्र यादव (वय 47, रा. जासूद गल्ली, मंगळवार पेठ) आला. त्यामुळे वाद अधिकच वाढत गेला. मुकुंदने पेट्रोल पंपाच्या दिशेने गेला आणि पिस्तुल घेऊन आला. यावेळी त्याने हवेत गोळीबार केला. आवाजाने एकच पळापळ होऊन गोंधळ उडाला. या पळापळीत काहीजण पडले.

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस उपनिरीक्षक रणजीत पाटील  घटनास्थळी फौजफाट्यासह आले. गोळीबार करणारा मुकुंद हातात पिस्तुल घेऊन तसाच उभा होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली.  शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस करीत आहेत.