कागल : बा. ल. वंदुरकर
एस. टी. महामंडळाच्या विविध 16 संवर्गातील 1 लाख कर्मचार्यांचा 70 वर्षानंतर गणवेश बदलला जाणार आहे. खाकी गणवेश जाऊन रंगीत गणवेश येणार आहेत. त्यामुळे कर्मचार्यांना नवीन तयार गणवेशाची उत्सुकता लागुन राहीली आहे. महामंडळाकडून राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थांकडुन नवीन गणवेशाचे डिझायन करुन घेण्यात आले आहे.
एस. टी. महामंडळा मार्फत 2018 हे नवीन वर्ष परीवर्तनाचे वर्ष म्हणुन मानले जात आहे. या वर्षात कार्यान्वित होणार्या विविध प्रवाशी व कर्मचाराभिमुख योजनांमुळे एस. टी. चा आणि एस. टी. प्रवाशांच्या सेवेचा कायापालट केला जाणार आहे. त्यातीलच एक भाग म्हणून महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एस. टीच्या 31 विभागीय कार्यालयात एकाच वेळी सर्व कर्मचार्यांना नवीन तयार गणवेशाचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, क्लार्क, तपासणीस तसेच इतर अधिकारी यांना त्यांच्या पदानुसार गणवेश देण्यात येणार आहे.
गेल्या 70 वर्षात एस. टी.च्या कर्मचार्यांच्या गणवेशाबाबत कोणत्याही सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. तेच गणवेश आणि कालबाह्य झालेली तीच खाकी फॅशन यामुळे कर्मचार्यांमध्ये उदासिनता जाणवत होती. सध्या गणवेश कोणत्या संस्थेचा आहे. याच्यावर संस्थेचा आणि कर्मचार्यांचा दर्जा अवलंबून राहत आहे. गणवेश म्हणजे संस्थेची प्रतिष्ठा बनली आहे. कर्मचार्यांनी गणवेश परिधान केला की कर्मचार्यांचा संस्थेप्रती आपोआपच अभिमान प्रकट होतो.
महामंडळाच्या सुमारे विविध 16 संवर्गातील 1 लाख 5 हजार कर्मचार्यांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. पूर्वी या कर्मचार्यांना दरवर्षी महामंडळाकडुन गणवेशासाठी कापड दिले जात असे. ते कापड पसंत न पडल्याने आपल्या सोईने कर्मचारी गणवेशचे कापड खरेदी करीत व गणवेश स्वत: शिऊन घेत. त्यामुळे साहजिकच एकाच पदावर काम करणार्या अनेक कर्मचार्यांच्या गणवेशामध्ये रंगापासुन ते शिलाईपर्यंत वैविध्य दिसुन येई. यामधुन गणवेशाची एकसंघता निघुन जाई. म्हणुन परीवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांची कार्यवाही देखील तातडीने सुरु केली.
केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणार्या राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थान कडुन नवीन गणवेशाचे डिझायन करुन घेण्यात आले आहे. हे डिझायन संपुर्ण राज्यातील एस. टी. च्या कर्मचार्यांशी प्रातिनिधीक स्वरुपात संवाद साधुन त्याच्या कामाचे स्वरुप, त्यांच्या गरजा, स्थानिक हवामान याचा विचार करुन नवीन गणेवशाचे प्रारुप तयार करण्यात आले. प्रत्येक कर्मचार्याला वर्षातून दोन तयार गणवेश दिले जाणार आहेत.