Sun, Jul 21, 2019 01:56होमपेज › Kolhapur › गौरी यांच्या मारेकर्‍यांना एसआयटी ताब्यात घेणार

गौरी यांच्या मारेकर्‍यांना एसआयटी ताब्यात घेणार

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गौरी लंकेश हत्येतील मारेकर्‍यांचा कॉ. गोविंद पानसरे हत्येत सहभाग निश्‍चित होत असल्याने मुख्य संशयित वैभव राऊतसह अन्य पाच मारेकर्‍यांना ताब्यात घेण्यासाठी एसआयटीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अप्पर पोलिस महासंचालक तथा एसआयटीचे प्रमुख संजीव सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व कर्नाटक सीआयडीच्या प्रमुख अधिकार्‍यांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात बैठक सुरू होती.

कसबा बावडा येथील पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीला एसआयटी, एटीएस, कर्नाटक सीआयडी पथकातील वरिष्ठाधिकार्‍यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते, असेही वरिष्ठ सूत्राकडून समजते.

लंकेश हत्येतील मारेकर्‍यांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. पानसरे हत्येतील मारेकर्‍यांशी कनेक्शन उघड होत आहे. राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. कॉ. पानसरे हत्येत संशयितांचे थेट कनेक्शन उघड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची सोमवारी रात्री कोल्हापुरात तातडीची बैठक झाली. त्यात तपासात निष्पन्‍न झालेल्या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा झाल्याचे समजते. कर्नाटक सीआयडी अधिकार्‍यांनीही संशयितांच्या चौकशीत निष्पन्‍न झालेल्या माहितीचा बैठकीत आढावा घेतला.

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी वैभव राऊतसह पाच जणांना ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही समजते. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सहायक तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह सातारा, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक बैठकीला उपस्थित होते, असेही सांगण्यात आले.