Fri, Nov 16, 2018 12:59होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात सेट-नेट, पीएचडीधारकांचा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्‍हापुरात सेट-नेट, पीएचडीधारकांचा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: Mar 03 2018 5:08PM | Last Updated: Mar 03 2018 5:08PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

सरकारच्या शिक्षण क्षेत्राबाबत उदासिन धोरणांचे उच्‍च शिक्षित सेट, नेट व पीएचडीधारक बळी ठरत आहेत. सेट व नेटच्या परीक्षा होत असल्या तरी प्राध्यापक भरती बंद आहे. कोल्‍हापूर विद्यापीठ क्षेत्रात प्राध्यापक पदाच्या १ हजार जागा तर राज्यात १० हजारांहून अधिक जागा रिक्‍त आहेत. या जागा त्‍वरीत भराव्यात या मागणीसाठी सेट, नेट व पीएचडी धारकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्‍हाधिकारी संजय शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिले. 

तासिका तत्‍वावर काम करणार्‍या प्राध्यापकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यांना मिळारे ६ ते ७ हजार रुपयांचे वेतनही नियमित मिळत नाही. तसेच पूर्ण रक्‍कमही मिळत नाही. त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे.  सरकारच्या भरती बंदच्या धोरणामुळे महाविद्यालयांत सीएचबीधारक प्राध्यापकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यांना योग्य मानधन मिळत नाही. मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त असल्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी यावेळी सेट, नेट व पीएचडीधारकांनी केली. 

तसेच राज्यात प्राध्यापक भरती ही पात्रता व गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धतीने त्‍वरीत करावी, राज्य सरकारने जीडीपीच्या ६ टक्‍के खर्च शिक्षणावर करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.