कुरूंदवाड : प्रतिनिधी
आर्थिक गैरव्यवहारामुळे डबघाईल आलेल्या एस. के. पाटील सहकारी बँकेच्या अपहाराला जबाबदार ठरविण्यात आलेल्या संचालकांविरोधातील कारवाई सुरूच ठेवा, त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करा, असे उच्च न्यायालयाने अवसायकाला बजावले.
संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अवसायकाने न्यायालयात दिली. या संचालकांच्या नावे असलेल्या मालमत्तांसह त्यांच्या नातेवाइकांच्या नावे हस्तांतरित केलेल्या मालमत्ताही जप्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पर्ण केली जाईल, अशी हमी देण्याचे प्रतिज्ञापत्र अवसायकाने न्यायालयात सादर केले आहे. याची दखल घेऊन न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना कारवाईचा प्रगत अहवाल दोन महिन्यात सादर करा, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.
दहा वर्षांपूर्वी 2008 मध्ये संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे अवसायनात आलेल्या कुरूंदवाड येथील एस. के. पाटील सह. बँकेतील कोट्यवधी रुपयाच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून कुरूंदवाड येथील जयप्रकाश पतसंस्था आणि ए. पी. पाटील सर्वोदय पतसंस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती के. के. तातेड व न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अवसायक प्रदीप मालगावे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करू जबाबदार संचालकांसह अन्य व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच आतापर्यंत शेतकरी सहकारी तंबाखू संघ कोल्हापूर यांच्याकडे सुमारे कोटी 1.90 लाख रुपये येणे असून, त्यांच्या शिरोली पुलाची येथील मिळकतीच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू करून करून 2 कोटी 53 लाख वसूल केले जातील.
मयूर दूध संघ अथवा इतर संस्थांचे सुरू असलेले पेट्रोल पंप, तसेच त्यांची बँक खाती सील केली जातील. संचालकांच्या स्थावर मिळकती जप्त करून त्यांच्या लिलावाच्या नोटिसा बजावल्या आहेत, तर आतापर्यंत 35 लाख रुपये वसूल केल्याची माहिती न्यायालयाला दिली.