Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Kolhapur › अधिपरिचारिकाच चालवतात ग्रामीण रुग्णालय

अधिपरिचारिकाच चालवतात ग्रामीण रुग्णालय

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 11:44PMगारगोटी : रविराज वि. पाटील

गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अधिपरिचारिका सांभाळत असल्याचे गंभीर वास्तव चित्र दिसत पाहयला मिळत आहे. येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील हजारो रुग्णांची आरोग्यसेवा रामभरोसे चालली आहे. रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून आरोग्य खाते खासगी आरोग्य सेवेला प्रोत्साहन देत आहे काय, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे. 

भुदरगड तालुक्याचे मुख्यालय हे गारगोटी आहे. तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी गारगोटी येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात डॉक्टर व औषधे उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी अशी एकूण चार पदे मंजूर आहेत. मात्र, केवळ एकच वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत. सुमारे दोनशे रुग्ण या रुग्णालयात दैनंदिन आरोग्यसेवा घेण्यासाठी येतात. याशिवाय सर्पदंश, अन्‍न विषबाधा, अपघात, प्रसूती यासारख्या रुग्णांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वाधिक रुग्ण या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी येतात. मात्र, सध्या डॉक्टर नसल्यामुळे या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. कार्यरत असणारे डॉ. चौगले यांच्या सुट्टी किंवा गैरहजेरीत अधिपरिचारिकांना रुग्णालय सांभाळावे लागत आहे. या कालावधीत इमर्जन्सी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या कार्यरत असलेल्या एक डॉक्टर आपली ड्युटी करून सुट्टीसाठी गेले असता या कालावधीत वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हते. परिचारिकांना दवाखान्यात सेवा द्यावी लागली. त्यामुळे ओपीडीसाठी आलेले सुमारे दीडशे व अ‍ॅडमिट असलेल्या वीस रुग्णांची मोठी गैरसोय झाली. प्रभारी डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे या दवाखान्याचा कारभार केवळ एका परिचारिकेवर चालवावा लागतो. 

रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तसेच औषधपुरवठा होत नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना शासकीय आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. शासन या ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टर उपलब्ध करून देत नसल्यामुळे आरोग्य विभाग खासगी आरोग्य सेवेला खतपाणी घालत असल्याचा संशय रुग्णाचे नातेवाईक व्यक्‍त करत आहेत.