Sat, Aug 24, 2019 21:42होमपेज › Kolhapur › रुपयाच्या घसरणीने महागाईचा धोका

रुपयाच्या घसरणीने महागाईचा धोका

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:07PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

अमेरिकेची बदललेली भूमिका, क्रूड ऑईलच्या वाढणार्‍या किमती आणि आयातदारांकडून डॉलर्सची मोठी मागणी या पार्श्‍वभूमीवर जगात बहुतेक देशांचे चलन डॉलर्सच्या तुलनेत घसरले आहे. भारतामध्ये डॉलर्सच्या तुलनेत रुपयाने सत्तरी पार केल्याने अर्थव्यवस्थेत अनेक संकटे उभी राहिली आहेत. यामध्ये महागाई वाढण्याचा धोका व्यक्‍त केला जात असून, परदेशी शिक्षण घेणार्‍या मुलांच्या शैक्षणिक खर्चामध्ये वाढ अटळ असून, औषधांच्या किमतीही वाढतील, असे बाजारातील विश्‍लेषकांचे मत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिकेने चीन विरुद्ध व्यापारी युद्ध पुकारले आहे. तेलाच्या उत्पादनांवर मर्यादा आणण्याच्या सूचना आपल्या कवेतील अनेक तेल उत्पादक राष्ट्रांना केल्या आहेत. इराणकडून तेल खरेदी न करण्याविषयी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. तर देशांतर्गत ‘स्वदेशी’चा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींचे परिणाम जगातील अनेक देशांच्या चलनावर होऊन अमेरिकन अर्थव्यवस्था एका बाजूला बळकट होताना दुसर्‍या बाजूला विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसू लागले आहेत. भारतात याचे परिणाम गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळताहेत. 67 रुपयांवर स्थिर असलेल्या डॉलर्सची किंमत वाढल्याने रुपयाने लिलया सत्तरी पार केली. यामुळे आयातदारांचे कंबरडे मोडण्याच्या मार्गावर आले आहे. शिवाय, क्रूड ऑईलच्या भावाने प्रतिबॅरल 77 डॉलर्सचा बेंचमार्क ओलांडल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून देशातील महागाईचा वाढीचा नारळ फुटण्याच्या मार्गावर आहे. 

भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अमेरिकेला प्राधान्य दिले जाते. अमेरिकेत शिक्षणासाठी येणार्‍या एकूण विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येचा क्रमांक पहिला लागतो. या विद्यार्थ्यांचा सगळा खर्च डॉलर्सवर अवलंबून आहे. त्यांना सरासरी 30 हजार डॉलर्स म्हणजे प्रतिवर्षी 20 लाख रुपये इतका खर्च येतो. अमेरिकन सरकारने त्यांच्या विद्या शाखेव्यतिरिक्‍त अन्य व्यवसायात नोकरी करण्यास मज्जाव केल्याने अर्धवेळ नोकरी करून शिक्षणाचा खर्च भागविण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. 

या स्थितीत डॉलर वाढल्यामुळे या शैक्षणिक खर्चात सरासरी तीन लाख रुपयांचा फरक पडू शकतो. हा खर्च संबंधित विद्यार्थ्यांच्या भारतीय कुटुंबीयांना शिरावर घेण्याची वेळ आली आहे. 

भारतीय आरोग्य सेवेमध्ये कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार आणि अस्थिरोग यावर केल्या जाणार्‍या उपचार पद्धतीमध्ये अनेक विदेशी औषधे वापरली जातात. अस्थिरोग आणि हृदयरोगामध्ये वापरल्या जाणार्‍या साहित्याचा (इम्प्लान्टस्) विदेशी कंपन्यांचा हिस्सा 80 टक्क्यांहून अधिक आहे. तर कर्करोगावरील औषधाची वरील श्रेणी पूर्णपणे आयात केली जाते. या किमती रुपयाच्या घसरणीने वाढणार आहेत. याचा अतिरिक्‍त भार भारतीय रुग्णांच्या खिशावर पडणार आहे.