Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Kolhapur › ऑक्टोबरपासून धावपट्टी विस्तारीकरण

ऑक्टोबरपासून धावपट्टी विस्तारीकरण

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 15 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला ऑक्टोबर महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. हे काम गुडगाव, हरियाणा येथील एन.एस.सी. कंपनीकडे देण्यात आले आहे. सध्या 1,320 मीटर लांब असलेली धावपट्टी विस्तारीकरणानंतर 2,300 मीटरची होणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने विमानतळाचा विस्तार केला जात आहे. पहिल्या टप्प्यात 16 कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. 750 एकर जागेत असलेल्या या विमानतळाची सध्याच्या धावपट्टीची लांबी वाढवण्यात येणार आहे.

या कामासाठी 74 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राधिकरणाने गुडगाव, हरियाणा येथील एन.एस.सी. या कंपनीला धावपट्टी विस्तारीकरणाचे काम देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. त्यानुसार कंपनीच्या अधिकार्‍यांनी विमानतळाची पाहणी केली. सध्या पाऊस सुुरू आहे, त्याचे प्रमाण कमी झाले की, आवश्यक यंत्रसामग्री विमानतळावर आणली जाईल. यानंतर ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. धावपट्टी विस्तारीकरणाचे काम करताना दैनंदिन विमानसेवेवर परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले.

‘कलर कोडेड झोनिंग मॅप’ द्या

दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणाचा फटका विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील नागरिकांना बसत आहे. नव्या बांधकामासाठी विमानतळ प्राधिकरणाची ‘एनओसी’ बंधनकारक आहे. या परवानगीबाबत ‘कलर कोडेड झोनिंग मॅप’ (सीसीझेडएम) तयार करून द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबतचा मॅप (नकाशा) तयार झाल्यानंतर त्यातील लाल रंगाच्या भागात समाविष्ट असणार्‍या मिळकतींसाठीच ‘एनओसी’ची गरज भासणार आहे.

कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हैदराबाद ऑक्टोबरपासून ‘उडाण-2’ योजनेंतर्गत कोल्हापूर-तिरूपती व कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर इंडिगो कंपनीच्या वतीने सेवा देण्यात येणार आहे. या सेवेचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. त्याद‍ृष्टीने तयारी सुरू आहे. या कंपनीकरिता तिकीट विक्री केंद्राची इमारत बांधून पूर्ण करण्यात आली आहे. यासह कोल्हापूर-बंगळूर मार्गावर अलायन्स एअर या कंपनीकडून सेवा देण्यात येणार आहे, ही सेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच कंपनीकडून लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावरही सेवा सुरू होणार आहे, त्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.