Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Kolhapur › रूकडीत ७२ तासांची संचारबंदी

रूकडीत ७२ तासांची संचारबंदी

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:48AM

बुकमार्क करा
रूकडी : वार्ताहर

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ रूकडी बंदवेळी दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडल्याने रूकडीसह परिसरात 72 तासांची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीत पेठ वडगावचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, एक गृहरक्षक दलाचा जवान व 11 पोलिस गंभीररीत्या जखमी झाले.

बुधवारी दिवसभर रूकडी गावात बंद होता. ग्रामस्थांनीही बंदच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांनी काढलेल्या प्रतिमोर्चाचे पडसाद उमटून गावातील आंबेडकरी समाज संघटनांनी निषेध मोर्चा काढला. काही समाजकंटकांनी गावातील डिजिटल बोर्ड फाडला. यावेळी दोन गटात जोरदार दगडफेक झाली. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सी. बी. भालके यांनी दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी चौक परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपर्‍या व रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहने यांची तोडफोड, जाळपोळीचे प्रकार घडले. पोलिसांनी लाठीहल्ला करून दोन्ही जमावांना पांगवले.

गुरुवारी सकाळी पुन्हा दोन्ही गटांना अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व विनायक नरळे, हातकणंगलेचे निरीक्षक भालके, पेठ वडगावचे निरीक्षक यशवंत गवारी यांनी शांतता बैठक घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सकाळी 11 च्या सुमारास दोन्ही गटाकडून पंचगंगा चौक परिसरात जोरदार दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी समीर  शिंगटे आणि तहसीलदार वैशाली राजमाने यांनी तातडीने 72 तासांचा संचारबंदीचा आदेश लागू केला. सायंकाळी गावामध्ये पोलिसांनी गावातून संचलन केले व शांततेचे आवाहन केले. अनेक ग्रामस्थांना पोलिसांचा मार खावा लागला. दिवसभरात या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे 40 ते 50 युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक गवारी, प्रकाश कांबळे, वैभव पाटील, आनंदा कदम आदी पोलिस कर्मचारी गंभीररीत्या जखमी आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलकाबू पथक, जलद कृती दल, राज्य राखीव पोलिस बल यांच्यासह पोलिस फौजफाटा तळ ठोकून आहे. रूकडीतील शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरपंच रफीक कलावंत, ग्रा. पं. सदस्य शीतल खोत प्रयत्न करीत आहेत.