कोल्हापूर : प्रतिनिधी
बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँकर्स युनियनच्या वतीने पुकारलेल्या संपामुळे बुधवारी बँकांचे कामकाज बंद राहिले. यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे कोटींची उलाढाल ठप्प झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील 300 बँकांचे 9 हजारांहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, उद्याही (दि. 31 मे) बँका बंद राहणार असल्याने दोन दिवसांची सुमारे 1500 कोटीची उलाढाल ठप्प होणार आहे. बँका बंदच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर कर्मचार्यांनी निदर्शने केली. बँक कर्मचारी व सरकारी अधिकार्यांच्या वेतनवाढीबाबत इंडियन बँक्स असेासिएशनतर्फे बँक कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत 2 टक्के इतकी अत्यल्प पगार वाढ देण्यात आली आहे. ही वाढ कर्मचार्यांना अमान्य आहे. त्यामुळे जलद वाटाघाटीतून लवकरात लवकर वेतनवाढीच्या प्रश्नावर करार घडवून आणावा. पगारात पुरेशी वाढ देण्यात यावी व इतर सेवाशर्तीत योग्य त्या सुधारणा घडवून आणाव्यात, वेतनवाढीच्या करारात श्रेणी एक ते श्रेणी सात अशा सर्व श्रेणीतील अधिकार्यांचा समावेश करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी कॉ. एस. ए. कर्णिक म्हणाले, केंद्र सरकार जाणीवपूर्वक बँक कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी हा संंप पुकारण्यात आला आहे. दोन दिवस बँका बंद राहणार असून, या कालावधीत बँकांचे सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवारपासून बँका पूर्ववत सुरू होणार आहेत. या बंदमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एका दिवसाची साडेसातशे कोटी अशी दोन दिवसांची पंधराशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. बंदमुळे पेन्शनच्या कागदोपत्री कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच चेक क्लीअरन्सची कामेही संथ गतीने होणार आहेत. बँकांमधील आर्थिक व्यवहार बंद राहिल्याने पैसे काढण्यासाठी एटीएमवर गर्दी होण्याची शक्यता आहे.