होमपेज › Kolhapur › कृषी पंपांची 20 हजार कोटी रुपये वीज थकबाकी 

कृषी पंपांची 20 हजार कोटी रुपये वीज थकबाकी 

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:38PM

बुकमार्क करा
म्हाकवे : डी. एच. पाटील

राज्यातील कृषी पंपधारकांच्या प्रत्यक्ष बांधावर न जाता शिवाय मीटर रीडिंग न घेताच वीज बिले शेतकर्‍यांना दिली जात आहेत. त्यामुळे सरासरी आकारणीमुळे शेतकर्‍यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आहेत. त्यामुळे पीक वाळू दे; पण वीज बिल नको. अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. राज्यात कृषी पंपांची थकबाकी 20 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

राज्यात 41 लाख कृषी पंपधारक असून केवळ साडेतीन लाख शेतकरीच नियमित वीज भरणा करतात. 25.41 लाख शेतकर्‍यांना मीटरद्वारे तर 15 लाख शेतकर्‍यांना अश्‍वशक्तीच्या आधारे जोडणी देण्यात आली आहे. मीटर बसवलेल्या पंपांचे रीडिंग घेतले जात नाही. वीज वापराचे रीडिंग न घेता सरासरीने हजारो रुपयांचे देयक देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. 

महावितरणच्या 16 परिमंडळांचे दोन झोनमध्ये विभाजन करण्यात आले. वर्षाकाठी 1 हजार 318 तासांवर वापर असलेल्या पुणे, नाशिक, भांडूप परिमंडळ पहिल्या झोनमध्ये तर राज्यातील उर्वरित परिमंडळांचा समावेश दुसर्‍या झोनमध्ये करण्यात आला आहे. दोन्ही झोनमध्ये अश्‍वशक्ती प्रति महिन्यानुसार वेगवेगळे दर करण्यात आले आहेत. पहिल्या झोनमध्ये पाच अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडणीसाठी 287, पाच ते साडेसातसाठी 320 व साडेसातच्या वर 357 रुपये प्रतिमहिना दर आहेत. दुसर्‍या झोनसाठीचे दर तुलनेत कमी असून पाच अश्‍वशक्तीपेक्षा कमी जोडणीसाठी 204, पाच ते साडेसातसाठी 234 व साडेसातच्यावर 257 रुपये प्रतिमहिना दर आकारण्यात येत आहे. सर्वच अश्‍वशक्तीच्या ग्राहकांसाठी व्हीलिंग शुल्क 122 रुपये निर्धारित करण्यात आले आहेत. 

वीज नियामक आयोगाने साडेसहा रुपये प्रतियुनिट सरासरी वीजपुरवठा दर मंजूर केला आहे. कृषी ग्राहकांसाठी सरासरी वीज आकारणी 3 रुपये 40 पैसे प्रतियुनिट मंजूर असून उर्वरित 3 रुपये 10 पैसे क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून इतर ग्राहकांकडून आकारण्यात येतो. या दरात सरासरी 1 रुपये 60 पैसे प्रतियुनिट सवलत देऊन मीटरद्वारे जोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना 1 रुपये 80 पैसे प्रतियुनिट दराने वीज देयकाची आकारणी करण्यात येते. मीटरद्वारे वीजजोडणी असलेल्या कृषी पंपांचे रीडिंग घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा प्रत्यक्ष बांधावर न जाता अंदाजे रीडिग बिले काढत आहे.
62 टक्के कृषी पंपांचे रीडिंगच होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात कृषी पंपांची सरासरी थकबाकी 20 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे महावितरणने वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे.