Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Kolhapur › गुलाब, मोगर्‍याचा सुगंध महागला!

गुलाब, मोगर्‍याचा सुगंध महागला!

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:24AMकागल : बा. ल. वंदुरकर

लग्नसराई आणि घरांच्या वास्तुशांती यांच्या धामधुमीमुळे तसेच वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती तिप्पटीने वाढल्या असुन मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध तर अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. या सर्व फुलांचा दर पुढे येणारा अधिक महिना आणि रमजान ईद पर्यंत तरी टिकून राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

शुभकार्यांना  विविध प्रकारच्या फुलांची गरज निर्माण होत आहे. 15 मे पर्यंत लग्न कार्याचे मुहूर्त फुल्ल असल्यामुळेे फुलांची मागणी वाढली आहे. जादा फुलांची मागणी व्यापार्‍यांकडे अगोदरच करावी लागत आहे. नाहीतर जादा दराने फुले विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामध्ये अधिक भर वाढत्या तापमानाची पडली आहे. या उन्हाच्या झळांमुळे नाजूक फुले कोमेजून जात आहेत. पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी होऊ लागली आहे.

निशिगंधाची फुले पूर्वी 50 ते 60 रुपये किलो होती. आता लग्नसराईमुळे 150 रुपयांच्या पुढे गेली आहे. झेंडूची फुले दहा रुपयांनी किलो असायची आता मात्र झेंडूने देखील भाव खाल्ला आहे. 40 ते 50 रुपये किलोच्या दराने विकला जात आहेत. झेंडू स्थानिक शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमणात उपलब्ध होत असला तरी देखील त्याची किंमत वाढली आहे. सध्या शेतकर्‍यांचा ऊस पिकात झेंडू फुलांचे आंतरपीक घेण्याकडे कल वाढला आहे. पाण्याची सोय असलेल्या शेतीमध्ये भर उन्हामध्ये फोंड्या माळावर झेंडू फुललेला दिसून येत आहे.

गुलाबाच्या एका फुलाचा दर पूर्वी चार - पाच रुपये होता. आता तेच एक फूल दहा रुपयाला मिळत आहे. ग्रीन हाऊसमधील डच गुलाबाला चांगली मागणी आहे. तसेच कलकत्ता झेंडू आणि पिवळा झेंडूचा दर कमी जास्त आहेे. मोगर्‍याच्या फुलांचा दर सध्या तिपटीने वाढला आहे. पूर्वी 200 रुपये किलो असायचा आता तोच दर 600 ते 700 रुपये झाला आहे. त्यामुळे मोगर्‍याचा वास महागात दरवळत आहे. मोगरा फुले चित्रदुर्ग भागातून जास्त येत असतात मात्र दर वाढला असला तरी त्याचा सुवास घेण्यासाठी किमतीला फार महत्त्व दिले जात नाही. लग्नकार्यामध्ये फुलांना पर्याय नसायचा. 

सध्या इव्हेंट आला आहे. त्यामुळे फुले न वापरता सर्रास प्लास्टिकची फुलेही  वापरली जात आहेत. फुलांचे खांब तयार करण्यात येत होते. आता प्लास्टिकचे खांब उभे करण्यात येत आहेत. फुलांचे पडदे केले जात नाहीत त्याचाही परिणाम सध्या होत असल्याची माहिती फूल व्यापारी गौतम गाडेकर यांनी दिली.