Tue, Apr 23, 2019 06:32होमपेज › Kolhapur › अर्ध्या पावसाळ्यातच रस्ते खड्डेमय!

अर्ध्या पावसाळ्यातच रस्ते खड्डेमय!

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:31AMकोल्हापूर ः राजेंद्र जोशी

कोल्हापुरातील रस्त्यांची सध्या अर्ध्या पावसातच चाळण झाली आहे. सप्टेंबरअखेरीस पावसाळा संपताच नव्या रस्त्यांच्या निविदा निघतील. महापालिकेत कारभार्‍यांची लगबग सुरू होईल. ढपल्याच्या चर्चा रंगतील. चिरीमिरीच्या वाटपाने विश्‍वस्त-अधिकारीही सुखावतील आणि जनतेच्या कराच्या पैशातून रस्त्यांना पुन्हा एकदा डांबराने सारवलेही जाईल. तथापि वर्षा-सहा महिन्यात निकामी होणार्‍या या रस्त्यांची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न मात्र निरुत्तर राहण्याची शक्यता आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेची एक स्वतंत्र व्यवस्थेमार्फत चौकशी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे वार्षिक आकारमान सुमारे 400 कोटींच्या घरात आहे. याखेरीज केंद्र व राज्य शासनाकडून प्रकल्पांतर्गत 600 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पाच्या जमेच्या बाजूला धरण्यात येत असल्याने अर्थसंकल्प 1000 कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपला आहे. यापैकी सरासरी 25 ते 30 कोटी रुपये प्रतिवर्षी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केले जातात. गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर सुमारे 300 कोटी रुपये शहरातील रस्त्यांवर खर्ची पडले आहेत. तथापि आजमितीला शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. जुने दोन, तीन वर्षांपूर्वी केलेले रस्ते तर वाहून गेल्यात जमा आहेत, पण जे रस्ते वर्ष-सहा महिन्यांपूर्वी झाले त्यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही. या रस्त्यांमध्ये खड्डे इतके की रस्ते शोधणे आज कोल्हापूरकरांना मुश्कील होऊन बसले आहे. 

कोल्हापूर शहरातील रस्ते कोणासाठी? असा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. महापालिकेतील कारभार्‍यांच्या ढपल्यासाठी की कंत्राटदारांच्या भल्यासाठी? असा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कारण जुने रस्ते खराब झाल्याखेरीज नव्या रस्त्यांची कामे निघत नाहीत, अशा एका विचित्र अर्थकारणामध्ये शहरातील रस्ते अडकले आहेत. या रस्त्यांच्या गुणवत्तेची खरोखरीच एकदा आयआयटीसारख्या उच्च तंत्रशिक्षण संस्थेकडून चौकशी झाली तर याचे बिंग फुटू शकेल. रस्त्यांच्या या दुरवस्थेला केवळ कंत्राटदार जबाबदार आहेत अशातील भाग नाही.

त्यांच्यावरील आर्थिक दबाव त्यांना काम करू देत नाही हे सत्यही आता उलगडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळेच एकेकाळी कंत्राटदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असलेल्या महापालिकेत आता कंत्राटदार मिळत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. दुसरे प्रशासनामध्ये नियोजन नाही आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची इच्छाही नाही हे आणखी एक कारण आहे. जगामध्ये प्लास्टिक वेस्ट मिश्रित रस्त्यांचे नवे तंत्रज्ञान विकसित झाले. दहा-दहा वर्षे या रस्त्यांना काही होत नाही हे सिद्धही झाले आहे. तरीही आम्ही जुन्या पद्धती सोडत नाही कारण रस्ते खराब झाले नाहीत तर ढपला पाडता येत नाही हे यामागचे खरे गमक असल्याने नागरिकांनाच आता रस्त्यांच्या गुणवत्तेचे आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. 

खराब रस्त्यांमुळे अपघात 

शहरातील एकाही रस्त्याला लेव्हल (पातळी) नाही हे सर्वात मोठे दुखणे आहे. याशिवाय रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था नाही हे आणखी एक महत्त्वाचे कारण रस्त्यांच्या दुरवस्थेमागे आहे. आणखी यामध्ये भरीत भर म्हणजे रस्त्यांच्या कामावर जे सुपरव्हीजन हवे त्याचा सर्वात मोठा अभाव हवे. अभियंत्यांना वेळ आणि स्वारस्य नसल्याने शहरातील रस्ते हे मुकादमांच्या सुपरव्हीजनखाली तयार होतात आणि अशा रस्त्यांवर नागरिकांना सर्कस करावी लागते. यामध्ये काही निष्पापांचे बळी जातात, काहींना कायमचे अपंगत्व येते.  केवळ खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांवर प्रतिवर्षी एकत्रित कोट्यवधी रुपयांचा दवाखान्याचा खर्च लादला जाऊ लागला आहे. याकडे आम्ही गांभीर्याने पाहणार आहोत की नाहीत हाच खरा प्रश्‍न आहे.